Delhi CM Arvind Kejriwal (Photo Credits: ANI)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (9 जून) कोव्हिड टेस्टसाठी स्वॅब टेस्ट दिली आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून ताप आणि घशात खवखव अशी लक्षणं दिसत असल्याने त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून आता खबरदारीसाठी आज त्यांची कोव्हिड टेस्ट करण्यात आली आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या टेस्टचे रिपोर्ट्स आज संध्याकाळी उशिरा किंवा उद्या (10 जून) सकाळपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देखील अरविंद केजरीवाल यांची प्रकृती ठीक नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सध्या अरविंद केजरीवाल कोणत्याही बैठकीत सहभागी होत नाहीत.

अरविंद केजरीवाल यांनी स्वतःला आयसोलेट केल्याचं वृत्त काल देण्यात आलं आहे. त्यांनी सरकारी कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवण्यात आलं आहे. काल त्यांनी कोणत्याही अधिकार्‍यांची भेट घेतलेली नाही. सरकारी निवासस्थानीच अरविंद केजरीवाल यांना आयसोलेट करण्यात आलं आहे.

ANI Tweet

दिल्ली सरकारच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार सकाळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी एका कॅबिनेट बैठकीमध्ये सहभाग घेतला होता, यावेळेस मनीष सिसोदिया, पर्यावरण मंत्री गोपाल राय, आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचा समावेश होता. मुख्य सचिव विजय देव देखील सहभागी होते.

दरम्यान दिल्लीमध्ये 29,943 जण कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 11,357 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 17,712 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत.