Defence Expo 2020: उद्यापासून लखनऊमध्ये सुरू होणार आशियातील सर्वात मोठा डिफेंस एक्स्पो; संपूर्ण जगाला दिसेल भारतीय सैन्याचे शौर्य
Representational Image (Photo Credits: PTI)

लखनऊमध्ये (Lucknow) उद्यापासून भारतीय सैन्याचे शौर्य संपूर्ण जगाला दिसणार आहे. शहरामध्ये होणाऱ्या डिफेन्स एक्सपो 2020 (Defence Expo 2020) साठी नवाबांची राजधानी पूर्णपणे तयार आहे. पहिले तीन दिवस म्हणजे पाच ते सात फेब्रुवारी या कालावधीत एक्स्पो फक्त निमंत्रितासाठी सुरु राहणार आहे. त्यानंतर शेवटचे दोन दिवस, आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी सर्वसामान्यांसाठी खुले राहील. लखनऊमध्ये होणाऱ्या डिफेन्स एक्स्पोमध्ये भाग घेण्यासाठी आतापर्यंत जगभरातील 1028 कंपन्यांनी नोंदणी केली आहे, जो एक विक्रम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बुधवारी संरक्षण एक्सपो-2020 च्या 11 व्या पर्वाचे उद्घाटन करतील. एक हजाराहून अधिक देशी परदेशी संरक्षण कंपन्यांचे प्रतिनिधी, संरक्षण मंत्री, संरक्षण अधिकारी, राजदूत आणि संरक्षण तज्ञांच्या उपस्थितीने, हा आशियातील सर्वात मोठा कार्यक्रम पार पडणार आहे. याद्वारे भारताचे वाढते लष्करी सामर्थ्य आणि शौर्य जगाला दिसेल.

उत्तर प्रदेश प्रथमच अशा कार्यक्रमाचे यजमानपद भूषवणार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने हे यशस्वी होण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. यूपीसाठी हा इव्हेंट महत्त्वाचा आहे, कारण या माध्यमातून संरक्षण कंपन्या त्यांच्याच संरक्षण कॉरिडॉरमध्ये येण्याची शक्यता आहे. सोबत हजारो कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. यूपी आणि लखनऊ यांचे या माध्यमातून जगभरात ब्रँडिंग होईल. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ देखील लखनऊचे खासदार आहेत, म्हणून त्यांच्यासाठीही हा इव्हेंट महत्वाचा आहे.

लखनऊमधील गृहनिर्माण विकास विभागाच्या आवारात, वृंदावनमध्ये आशियातील सर्वात मोठा शस्त्र मेळा भरला आहे. भारतामध्ये बनविलेली ही शस्त्रे 70 पेक्षा जास्त देशांच्या संरक्षण विभागाला आकर्षित करण्यास सज्ज आहेत. या जत्रेत भारतामध्ये बनवलेल्या धनुष तोफ, तेजस जेटपासून अनेक शास्त्रे मांडली जाती. एक्स्पो दरम्यान हवाई दल 82 तेजस मार्क -1 एशीही व्यवहार करणार आहे. दर दोन वर्षांनी आयोजित डिफेन्स एक्स्पोच्या 11 व्या पर्वात संरक्षण क्षेत्राशी संबंधित 500 पेक्षा अधिक देशी विकसित उत्पादने सादर केली जातील. (हेही वाचा: भारतीय सैन्याची ताकद वाढणार; लष्कराकडून 40 दिवसांच्या युद्धाचा शस्त्रसाठा जमवण्यास सुरुवात)

डिफेन्स एक्स्पोमध्ये प्रथमच अमेरिकन दिग्गज एरोस्पेस कंपनी लॉकहीड मार्टिनचा आधुनिक एफ-35 लढाऊ विमान येत आहे. हे सर्वात मोठे आकर्षण असू शकते. 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशला संरक्षण कॉरिडॉरची भेट दिली. त्याच वर्षी चेन्नईमध्ये डिफेन्स एक्सपो आयोजित करण्यात आला होता.