प्रसिद्ध MDH मसाल्यामध्ये आढळले घातक बॅक्टेरिया; ग्राहकांना पाकिटे परत करण्याचे आवाहन, मिळणार संपूर्ण पैसे परत
एमडीएच मसाला (Photo Credits: Twitter)

भारतातील आघाडीची मसाला निर्माती कंपनी एमडीएचच्या (MDH)च्या सांभर मसाल्यात साल्मोनेला बॅक्टेरिया असल्याचे आढळले आहे. यानंतर  या मसाल्यांचे कमीतकमी तीन लॉट अमेरिकेतून परत मागवण्यात आले आहेत. अमेरिकेच्या अन्न व औषध नियामक संस्था एफडीएने (US FDA) घेतलेल्या काही चाचण्यांच्या निकालानंतर, गेल्या आठवड्यात हे पाऊल उचलण्यात आले. त्यानंतर एफडीएने सर्व ग्राहकांना हे दूषित एमडीएच मसाले त्यांनी खरेदी केलेल्या दुकानात परत करण्याचे आवाहन केले आहे. यूएसएफडीएने नमूद केले आहे की, या मसाल्यांचे पैसे ग्राहकांना दुकानदाराकडून परत करण्यात येतील येतील.

अमेरिकन एफडीएने दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार,'एफडीएने प्रमाणित प्रयोगशाळेत घेतलेल्या मासाल्याच्या चाचणीत साल्मोनेला सापडल्याची पुष्टी झाली आहे. एफडीएने साल्मोनेला-संक्रमित उत्पादनांच्या वितरणाची माहिती मिळाल्यानंतर ही उत्पादने परत पुन्हा मागवण्यात आली आहेत.

(हेही वाचा: मुंबई: ज्यूस बनवण्यासाठी वापरण्यात येणारी गाजरे पायाने धुण्याचा धक्कादायक प्रकार; महापालिकेकडून कारवाई (Video)

एफडीएच्या म्हणण्यानुसार साल्मोनेला जीवाणूमुळे साल्मोनेलोसिस नावाचा आजार होतो. अतिसार, पोटदुखी आणि ताप ही त्याची लक्षणे आहेत. यामध्ये बरेच लोक उपचार घेतल्याशिवाय बरे होतात, मात्र, काही लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते. एजन्सीनुसार वृद्ध, नवजात आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक या आजाराला बळी पडण्याची सर्वात जास्त भीती आहे.