Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रवादळ आक्रमक रुपात; 7,500 नागरिकांना सुरक्षीत स्थळी हालवले, 67 रेल्वेगाड्याही रद्द
Cyclone (Photo Credits: Pixabay)

Cyclone Biparjoy Updates: बिपरजॉय चक्रवादळ रौद्र रुप धारण करु लागल्याचे चित्र आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा रोख पाहून भारतीय हवामान विभागानेही (India Meteorological Department) मंगळवारी (13 जून) गुजरातच्या सौराष्ट्र (Saurashtra) आणि कच्छ (Kutch ) किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, गुजरात किनारपट्टीवर आणि मुंबई शहरासह किनारपट्टी परिसरात जोरदार वारे आणि भरतीच्या लाटा उसळत आहेत. या लाटा आणि वाऱ्याचा वेग विचारात घेतला तर आगामी काळात बिपरजॉय चांगलेच रौद्र रुप धारण करेल अशी शक्यता आहे. दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 15 जून रोजी गुजरातच्या सागरी किनारपट्टीत धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने सुमारे 7,500 नागरिकांना आगोदरच सुरक्षीत ठिकाणी हालवण्यात आले आहे. शिवाय रेल्वे मंत्रालयानेही एक 'वॉर रुम' तयार केली आहे. शिवाय 67 रेल्वे गाड्याही रद्द केल्या आहेत.

हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे की, चक्रीवादळ बिपरजॉय 15 जूनच्या संध्याकाळपर्यंत जाखाऊ बंदर क्षेत्र ओलांडण्याची शक्यता आहे. हे वादळ 15 जून रोजी सौराष्ट्र-कच्छ आणि पाकिस्तानला लागून असलेल्या किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे, असे आयएमडीच्या अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा, Cyclone Biparjoy: 'बिपरजॉय' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने रद्द केल्या 67 गाड्या; CPRO यांची माहिती, जाणून घ्या यादी)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली आणि बिपरजॉय चक्रीवादळाच्या तयारीचा आढावा घेतला. परिसरातील मच्छिमारांना पाच दिवस किनाऱ्यापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) ने काही ट्रेन सेवा रद्द केल्या आहेत कारण चक्रीवादळ 'बिपरजॉय' 16 जून रोजी नैऋत्य राजस्थानमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.

माहिती आणि प्रकाशन रेल्वे बोर्ड, दिल्लीच्या संचालकांच्या मते, “आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय करण्यात आला आहे आणि फील्ड स्टाफला अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. भावनगर, राजकोट, अहमदाबाद आणि गांधीधाममध्ये आपत्कालीन नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहेत.