Representational Image (File Image)

आज देशभरात बालदिन मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. अशात लहान मुलांविषयीच्या गुन्ह्याबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये मुलांशी निगडीत सायबर गुन्ह्यांमध्ये (Cyber Crimes Against Children) 400 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. यातील बहुतेक गुन्हे लैंगिक कृत्यांमध्ये लहान मुलांचे चित्रण करणाऱ्या कंटेंटचे प्रकाशन किंवा प्रसारणाशी संबंधित आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.

NCRB च्या आकडेवारीनुसार मुलांविरुद्ध सायबर गुन्ह्यांशी संबंधित शीर्ष पाच राज्यांमध्ये उत्तर प्रदेश (170), कर्नाटक (144), महाराष्ट्र (137), केरळ (107) आणि ओडिशा (71) आहेत. ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये मुलांविरुद्ध ऑनलाइन गुन्ह्यांची एकूण 842 प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी 738 प्रकरणे लैंगिक कृत्यांमध्ये मुलांचे चित्रण करणारी कंटेंट प्रकाशित किंवा प्रसारित करण्याशी संबंधित होती. 2020 च्या NCRB डेटावरून असे दिसून आले आहे की 2019 च्या तुलनेत मुलांविरुद्धच्या सायबर गुन्ह्यांमध्ये (माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत नोंदणीकृत) 400 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. (हेही वाचा: Madhya Pradesh: अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, पीडितेवर आरोपीकडून दोन वर्ष बलात्कार)

2019 मध्ये मुलांविरुद्ध सायबर गुन्ह्यांची 164 प्रकरणे नोंदवण्यात आली, तर 2018 मध्ये मुलांविरुद्ध सायबर गुन्ह्यांची 117 प्रकरणे नोंदवण्यात आली. यापूर्वी 2017 मध्ये अशा 79 प्रकरणांची नोंद झाली होती. 'क्राय-चाइल्ड राइट्स अँड यू' या स्वयंसेवी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा मारवाह सांगतात की, आजकाल मुले शिक्षणासाठी किंवा इतर कारणास्तव इंटरनेटवर अधिक वेळ घालवताना दिसत आहेत. अशावेळी त्यांना ऑनलाइन लैंगिक शोषण, अश्लील संदेशांची देवाणघेवाण, पोर्नोग्राफी, लैंगिक शोषण कंटेंट, सायबर-गुंडगिरी आणि ऑनलाइन छळ अशा अनेक प्रकारच्या जोखमींचा सामना करावा लागत आहे.