उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊमध्ये (Lucknow) एक खास रेस्टॉरंट उघडले आहे, जिथे लोकांना नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व काही ऑर्गेनिक मिळणार आहे. म्हणजे इथे लोकांच्या चवीसोबतच आरोग्यावरही लक्ष दिले जाणार आहे. या रेस्टॉरंटमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना ज्यूस, स्प्राउट्स सारख्या गोष्टी तर फास्ट फूड लव्हर्सना पिझ्झा-बर्गर सारखे पदार्थही मिळणार आहेत.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या रेस्टॉरंटचे उद्घाटन कोणत्या नेत्याने किंवा व्हीआयपी व्यक्तीने केले नाही, तर एका गायीने केले आहे. असे दृश्य आजपर्यंतच्या कोणत्याही रेस्टॉरंटच्या उद्घाटन समारंभात दिसले नव्हते. गायीला माता समजले जाते. गाय हिंदू धर्मात पूजनीय आहे. बरेच लोक गायीच्या दूधासोबत गोमूत्राचेही सेवन करतात. रोजच्या जीवनात शेणाचाही वापर करतात. गाय हा प्राण्यांमध्ये सर्वात पवित्र मानला जातो म्हणूनच लखनौमध्ये जेव्हा पहिले ऑरगॅनिक रेस्टॉरंट सुरू झाले तेव्हा त्याचे उद्घाटन गिर जातीच्या देशी गायीद्वारे करण्यात आले.
या रेस्टॉरंटची सुरुवात उत्तर प्रदेशचे माजी डीएसपी शैलेंद्र सिंह यांनी केली असून या खास ऑरगॅनिक किचनचे नाव 'ऑर्गेनिक ओएसिस' (Organic Oasis) आहे. लुलू मॉलच्या शेजारी, सुशांत गोल्फ सिटीमध्ये हे रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे. शैलेंद्र सिंह यांनी इंडिया टुडेला सांगितले की, ‘सेंद्रिय अन्नामध्ये कीटकनाशके आणि इतर हानिकारक रसायने नसतात, म्हणून ज्यांना स्वच्छ आणि वनस्पती-आधारित आहार घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. ऑरगॅनिक फूड हा शरीरासाठी नेहमीच आरोग्यदायी पर्याय राहिला आहे.’
#WATCH | Uttar Pradesh: A restaurant in Lucknow, 'Organic Oasis' that offers food made out of organic farming produce, was inaugurated by a cow. pic.twitter.com/YWcfKqJQcX
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 18, 2023
शैलेंद्र सिंह पुढे म्हणाले की, त्यांच्या गोठ्यातील शेण शेतात टाकले जाते. तिथे रसायनांशिवाय फळे आणि भाजीपाला पिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, रेस्टॉरंटमध्ये वापरण्यात येणारे मसाले केरळमधील सेंद्रिय शेतातून आणले गेले आहेत. ज्या लोकांना त्यांच्या स्वयंपाकघरासाठी कच्चा माल हवा असेल तर तोही येथे उपलब्ध करून दिला जाईल. शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार असून, जे बेरोजगार आहेत त्यांना या रेस्टॉरंटचे डिलिव्हरी बॉय किंवा डिलिव्हरी गर्ल म्हणून काम करण्याची संधी मिळेल. (हेही वाचा: Happiest State in India: मिझोराम ठरले देशातील सर्वात आनंदी राज्य, जाणून घ्या कारणे)
शैलेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, हे सुरू करण्यामागील कारण म्हणजे दुकानदार लोकांना महागड्या दरात फास्ट फूड खाऊ घालत आहेत, त्यामुळे लोकांचे आरोग्य बिघडत आहे. 'ऑर्गेनिक ओएसिस' येथे सर्व काही शुद्ध, कमी किमतीत सेंद्रिय असेल. हे रेस्टॉरंट सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार असून, या ठिकाणी 50 लोकांची आसनक्षमता आहे.