भारतीय पशु कल्याण मंडळाने (Animal Welfare Board of India) 14 फेब्रुवारी हा दिवस ‘काउ हग डे’ (Cow Hug Day) म्हणजेच गाईला आलिंगन देण्याचा दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन मागे घेतले आहे. जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांवर असलेले प्रेम व्यक्त करतात. मात्र यंदा भारतात या दिवसासंदर्भात विशेष आवाहन करण्यात आले होते, ज्याची सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
अॅनिमल वेल्फेअर बोर्डने 14 फेब्रुवारी रोजी गाय आलिंगन दिन साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यामागील युक्तिवादही प्राणी कल्याण मंडळाने 6 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या अपील पत्रात देण्यात आला होता.
बोर्डाने लिहिले होते की, भारतीय संस्कृती, आपल्या जीवनाचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा गाय आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. गाईला आपण कामधेनू आणि गौमाता म्हणतो. मात्र पाश्चात्य संस्कृतीमुळे वैदिक परंपरा जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गायीचे असंख्य फायदे लक्षात घेता तिला मिठी मारल्याने आनंद मिळतो. म्हणूनच सर्व गोप्रेमी 14 फेब्रुवारी हा दिवस ‘काउ हग डे’ म्हणून साजरा करू शकतात. यामुळे जीवन आनंदी होईल आणि पूर्णपणे सकारात्मक उर्जेने भरले जाईल.
हे आवाहन केल्यानंतर सोशल मीडियावर लोकांकडून नाराजी व्यक्त होत होती, तर काहींनी या आवाहनाचे समर्थन केले होते. या आवाहनाबाबत सोशल मीडियावर शेकडो मीम्स आणि जोक्सही बनवण्यात आले होते. मात्र आज हे आवाहन मागे घेतले गेले. आज 10 फेब्रुवारी रोजी बोर्डाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात नमूद केले आहे की, 14 फेब्रुवारी 2023 रोजी ‘काउ हग डे’ साजरा करण्याचे आवाहन मंत्रालयाच्या निर्देशानंतर मागे घेण्यात आले आहे. याचे कारण सांगण्यात आलेले नाही. (हेही वाचा: Valentine’s Day Vs Cow Hug Day: व्हॅलेंटाईन डे ऐवजी मारा गाईला मिठी; अॅनीमल वेल्फेअर बोर्डाचा ‘काउ हग डे’ चर्चेत)
दरम्यान, अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे. केंद्र आणि राज्य सरकारला प्राण्यांच्या कल्याणासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरणे तयार करण्यात मदत करणे हे या संस्थेचे काम आहे.