Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

COVID19 3rd Wave: देशात सध्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक कमी होत आहे. त्यामुळे सरकारकडून नियमांत शिथिलता आणत काही गोष्टी पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र लसीकरणावर ही अधिक जोर दिला जात आहे. नागरिकांना सातत्याने लसीकरणासाठी प्रोत्साहन केले जात आहे. अशातच आता 18 वर्षांपेक्षा कमी वयातील मुलांना सुद्धा लस दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आयसीएमआरचे अतिरिक्त महासंचालक डॉ. समीरन पांडा यांनी असे म्हटले की, कोरोनाची तिसरी लाट ही फेब्रुवारीच्या अखेर पर्यंत महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये कमी होणार आहे. या राज्यातील कोरोनाचे रुग्ण महिन्याच्या अखेरपर्यंत कमी होतील. तर एकूणच देशातील कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कमी होईल असे त्यांनी म्हटले.

एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. चंद्रकांत लहरिया यांनी टाइम्स ऑफ इंडियाला असे ही म्हटले की, देशातील कोरोनाची तिसरी लाट ही पुढील तीन-चार आठवड्यात ओसरेल. ओमिक्रॉनचे 90 टक्के रुग्ण आणि डेल्टाचे अवघे 10 टक्के रुग्ण असून तिसऱ्या लाटेत त्याची जगभरातील आकडेवारी कमी जास्त होत असल्याचे दिसून आले.(COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 1,27,952 नवे कोरोनारूग्ण;1059 मृत्यू)

आयसीएमआरच्या गणितीय मॉडेल-आधारित प्रोजेक्शननुसार, महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल येथील राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर रुग्णांमध्ये एकाच महिन्यात घट सुद्धा होत असल्याचे दिसून आले. तसेच कोरोनाचा नवा वेरियंट SARS-CoC-2 हा भविष्यात आल्यास तो नियंत्रित करता येऊ शकतो.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. तसेच अन्य 34 राज्यात सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी कमी होताना दिसून आले आहे. या व्यतिरिक्त तज्ञांना सुद्धा या राज्यांमधील जिल्ह्यात ही रुग्ण कमी झाले असल्याचे म्हटले आहे.