Union Health Minister Dr Harsh Vardhan | (Photo Credits: ANI)

गेल्या अनेक महिन्यांपासून देशाला कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा विळखा बसला आहे आणि दिवसागणित तो अधिकाधिक घट्ट होत आहे. त्यामुळे कोविड-19 (Covid-19) वरील लसीच्या विकासाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr Harsh Vardhan) यांनी लसी (Vaccine) संबंधित महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. जुलै 2021 पर्यंत 400-500 मिलीयन लसीचे डोस सुमारे 25 कोटी लोकांना पुरवण्याचे लक्ष्य असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी संडे संवाद (Sunday Samvaad) या कार्यक्रमात सांगितले.

लसीच्या विकासावर उच्चस्तरीय तज्ञ काम करत आहेत. जुलै 2021 पर्यंत भारत 400-500 मिलियन डोस 25 कोटी लोकांना पुरवले, असा आमचा अंदाज आणि उद्दिष्ट असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तसंच लस तयार झाल्यानंतर लसीच्या डोसांचे योग्य आणि न्याय वितरण होण्यासाठी सरकार 24 तास काम करत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मिळेल, हे आमचे प्राधान्य असेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (कोविड 19 विरूद्ध लस 2021 च्या सुरूवातीपर्यंत उपलब्ध होऊ शकते; केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची राज्यसभेत माहिती)

ANI Tweet:

तसंच सर्वप्रथम कोणाला लस द्यायची याचा प्राधान्यक्रम राज्य सरकारकडून ठरवण्यात येईल. वैद्यकीय सेवेतील डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य सेवक त्याचप्रमाणे सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमधील कर्मचारी यांना सर्वप्रथम लस देण्यात येईल, असेही डॉ. हर्षवर्धन म्हणाले. भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला या दोन महत्त्वाच्या लसीच्या चाचण्या मधल्या टप्प्यात आल्या आहेत. या दोन्ही लस 2021 च्या सुरुवातीलाच येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

2021 च्या सुरूवातीला भारतामध्ये कोरोना व्हायरस वरील लस उपलब्ध होऊ शकते, असा विश्वास यापूर्वी आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या लेटेस्ट अपडेटनुसार, भारतातील कोरोना बाधितांच्या आकडा 65 लाखांच्या पार गेला असून मागील 24 तासांत 75,829 नव्या रुग्णांसह 940 मृतांची नोंद झाली आहे. या नव्या वाढीमुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 65,49,374 इतकी झाली आहे. त्यापैकी 9,37,625 अॅक्टीव्ह रुग्ण असून 55,09,967 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1,01,782 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.