जगभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत असताना आता सार्यांचेच लक्ष हे थैमान रोखणार्या लसीकडे लागले आहे. युके मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनेका बनवत असलेल्या लसीचे मॅन्युफॅक्चरिंग करणार्या सीरम इंस्टिट्युटने आता भारतामध्येदेखील त्या लसीच्या मानवी चाचणीसाठी परवानगी मिळवली आहे. आता सीरम इन्स्टिट्युटला GAVI या आंतरराष्ट्रीय लस संस्थेची तसेच बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनशी भागीदारी मिळाली आहे. Serum Institute of India ने आज जारी केलेल्या पत्रकामध्ये US$150 मिलियनची मदत गेट्स फाऊंडेशन कडून दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सीरम इन्स्टिट्युटने दिलेल्या माहितीमध्ये या मदतीच्या आधारे भारतासह जगभरातील गरीब आणि मध्यम उत्पन्न असणार्या देशामध्ये कोविड 19 ची लस पुरवण्यासाठी 2021 पर्यंत सुमारे 100 मिलियन डोस उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान या पत्रकामध्ये अजून एक महत्त्वपूर्ण देण्यात आलेली माहिती म्हणजे या लसीची किंमत. सीरम इन्स्टिट्युटच्या माहितीनुसार या लसीची किंमत 3 यूएस डॉलर असेल. ही लस जगभरातील 92 देशांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सीरम इन्स्टिट्युटने ऑक्सफर्ड-AstaZeneca आणि अमेरिकेच्या Novavax या कंपनीसह कोविड 19 विरूद्धच्या लशीबाबत करार केला आहे. देशात सीरमची ही लस कोविशिल्ड म्हणून ओळखली जाईल. तर येत्या काही दिवसांतच मानवी चाचणीसाठी दुसर्या आणि तिसर्या टप्प्यासाठी त्याला परवानगी देण्यात आल्याने क्लिनिकल ट्रायल्सदेखील सुरू होणार आहेत.
Serum Institute of India ची पोस्ट
भारतामध्ये सध्या सीरम इंस्टिट्युटच्या लसीसोबतच कोवॅक्सिन या भारत बायोटेक आणि आयसीएमआर च्या लसीची तसेच झायडस कॅडीला या कंपनीच्या कोविड 19 विरूद्ध संभाव्य लसीचे ट्रायल्स सुरू आहेत.