
कोरोना विषाणू लसीच्या (Coronavirus Vaccine) प्रतीक्षेत असलेल्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय नियामक पुढील आठवड्यात ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेका (Oxford-AstraZeneca) कोरोना लस मंजूर करू शकते. या मंजुरीपूर्वी अधिकाऱ्यांनी स्थानिक उत्पादक सीरम इन्स्टिट्यूटकडून काही माहिती मागितली होती, ज्यावर सखोल चर्चा सुरु आहे. ब्रिटिश औषध नियामक अजूनही ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेका लसीवर स्वत: चाचण्या घेत असल्यामुळे, ब्रिटीश औषध निर्माता ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेकाच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास अनुमती देणारा भारत पहिला देश ठरला जाईल. भारताने यापूर्वीच अॅस्ट्रॅजेनेकाच्या लसीचे पाच कोटीहून अधिक डोस तयार केले आहेत, जे लसीकरणात वापरले जाऊ शकतात.
भारत, जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे जो पुढील महिन्यात आपल्या नागरिकांसाठी लसीकरण सुरू करू इच्छितो. ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेका व्यतिरिक्त, भारतीय नियामक फायझर इंक. आणि स्थानिक कंपनी भारत बायोटेक यांनी तयार केलेल्या लसींच्या आणीबाणीच्या वापरावर विचार करीत आहे. विशेष गोष्ट म्हणजे, ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेकाची कोरोना लस कमी उत्पन्न असलेल्या देशांसाठी आणि गरम हवामानातील लोकांसाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. ही लस स्वस्त आहे, तिची वाहतूक करणे सोपे आहे आणि सामान्य फ्रिज तापमानात ती जास्त काळ साठवली जाऊ शकते.
जगभरात कोरोना व्हायरसचा दुसरा हल्ला होण्याचा धोका आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन सापडल्याने खळबळ उडाली आहे. अशावेळी सर्वांच्याच आशा आता कोरोनाच्या लसीवर अवलंबून आहेत. प्रत्येकजण ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसची वाट पाहत आहे. जगभरातील इतरही अनेक देशांमध्ये कोविड-19 च्या लसीची चाचणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेका लस पुढील आठवड्यापर्यंत मंजूर होऊ शकते, ही भारतासाठी एक दिलासादायक बाब आहे.
ऑक्सफोर्ड लस मंजूर होण्यापूर्वी फायझर लसची पहिली तुकडीही भारतात पोहोचणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 28 डिसेंबर रोजी लसीची पहिली खेप येत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आधीच सांगितले आहे की जानेवारीपासून देशात लसीकरणाचे काम सुरू होईल. आशा आहे की फायझर आणि ऑक्सफोर्डच्या लसी लसीकरणात वापरल्या जाऊ शकतात. सुरुवातीला सुमारे 30 कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे.