COVID-19 Third Wave: भारतात ऑगस्ट महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट; सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या पोहचू शकते शिगेला- रिपोर्ट
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

देशामध्ये कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) ऑगस्ट (August) महिन्याच्या मध्यापर्यंत येण्याची संभावना असून सप्टेंबर (September) महिन्यामध्ये रुग्णसंख्या शिगेला पोहचू शकते, असा अंदाज एका रिपोर्टमधून वर्तवण्यात आला आहे. एसबीआय रिसर्चच्या (SBI Research) रिपोर्टमधून ही माहिती समोर आली असून 'Covid-19: The race to finishing line' असे या रिपोर्टचे शिर्षक आहे. देशामध्ये अद्याप कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही. तर यापुढे येणाऱ्या तिसरी लाटेत दुसऱ्या लाटेपेक्षा 1.7 पटीने अधिक रुग्ण आढळून येण्याची शक्यता आहे. या सगळ्यावर लसीकरण हा एकमेव उपाय आहे.

देशातील एकूण लोकसंख्येपैकी फक्त 4.6 टक्के लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. तर 20.8 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. हे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत फारच कमी आहे. अमेरिकेत हे प्रमाण 47.1 टक्के, युके 48.7 टक्के, इज्राईलमध्ये 59.8 टक्के तर स्पेनमध्ये 38.5 टक्के इतके आहे. देशामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या लाटेमधील रुग्णसंख्येचा उच्चांक 7 मे रोजी दिसून आला होता. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुमारे 10,000 रुग्ण आढळण्याची शक्यता आहे, अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्रुफ चीफ इकोनॉमिक अॅडव्हायजर सौमय्या कांती घोष यांनी रिपोर्टमध्ये दिली आहे.

अजूनपर्यंत देशामध्ये 12 विविध राज्यांमध्ये डेल्टा प्लस वेरिएंटचे 51 रुग्ण आढळले आहेत. परंतु, या डेल्टा प्लस वेरिएंटची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत नाहीये, ही चांगली बाब आहे. (Covid-19 Third Wave: कोविड-19 ची तिसरी लाट किती धोकादायक असेल? काय म्हणतात सरकारी पॅनेलचे वैज्ञानिक? जाणून घ्या)

भारतामध्ये सध्या दिवसाला 40 लाख नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेश, केरळ आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये 60 वर्षांवरील जवळपास सर्व नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. परंतु, ग्रामीण भागातील लसीकरणाचे प्रमाण अद्यापही कमी आहे.

तामिळनाडू, पंजाब, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार, झारखंड या राज्यांमध्ये 45 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. या राज्यांमधील लसीकरणाचा वेग वाढणे अत्यंत गरजेचे आहे, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. भारतामध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवा वेरिएंट आता युएस, युके, चीन, जपान, पोलंड, पोर्तुगाल, रशिया आणि स्विर्झंलंँड या देशांमध्ये सुद्धा आढळून आला आहे.