COVID-19 New Symptoms: तीव्र डोकेदुखी, ऐकण्याची समस्या यांसह 'ही' आहेत कोविड-19 ची नवी लक्षणे
Headache | Representational Image | Photo Credits: Pixabay)

कोविड-19 चे संकट (Covid-19 Pandemic) देशात अद्याप कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) शिथिल होत असताना पुन्हा वाढणारी रुग्णसंख्या आणि तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका कायम आहे. यातच जीवघेणा व्हायरस सातत्याने आपले स्वरुप बदल असल्याने कोविड-19 संसर्गाच्या लक्षणांमध्येही बदल होत आहे. कोरोनाच्या सामान्य लक्षणांमध्ये सर्दी, खोकला, थकवा इत्यादींचा समावेश आहे. परंतु, आता नवी लक्षणे समोर आली आहेत. तीव्र डोकेदुखी, ऐकण्याची समस्या यांच्यासह कोरोनाची अनेक नवी लक्षणे समोर आली आहेत.

कोरोनाची काही नवीन लक्षणे समोर आल्याचे टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी ही माहिती कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांच्या हवाल्याने दिली आहे. यात ऐकण्याची समस्या, तीव्र डोकेदुखी, थकवा, तोंड कोरडे पडणे, त्वचेवर चकते येणे यांचा समावेश आहे.

आरएन कूपर हॉस्पिटलचे ईएनटी प्रमुख समीर भार्गव म्हणाले की, कोरोनामुळे ऐकण्याच्या समस्यांच्या तक्रारी कमी येत आहेत. मात्र जळजळ किंवा इन्फेक्शनमुळे शिरामध्ये गुठळ्या झाल्यामुळे ऐकण्यात काही अडचण येऊ शकतात. मात्र भारतात त्याच्या तक्रारी कमी आहेत. परंतु, असे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर स्टेरॉईड्सने उपचार केले जातात.

टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ.संजय ओक यांनी देखील कोविड-19 च्या लक्षणांबद्दल भाष्य केले. कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान डेल्टा वेरिएंटमुळे रुग्णांना अतिसार, गॅस आणि उलट्या सारख्या लक्षणांचा सामना करावा लागला.

पुढे ते म्हणाले की, कोविडची लक्षणे वेगवेगळ्या लोकांमध्ये भिन्न असतात. ताप येण्यातही वेगळेपण आढळून येते. कोणाला ताप येतो, कोणाला येत नाही. तर कोणाला 2-3 दिवसांनी ताप येतो. काही लोकांना पुन्हा पुन्हा ताप येतो.