Covid-19 Deaths: देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही; केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती
Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

देशात कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट फार भयानक होती. या काळात देशात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची (Oxygen) कमतरता भासली होती. अनेक रुग्णांचे मृत्य झाले होते. आता केंद्र सरकारने मंगळवारी राज्यसभेत सांगितले की, कोविड-19 च्या दुसर्‍या लाटेदरम्यान देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की कोणत्याही राज्याने किंवा केंद्र शासित प्रदेशाने ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याची नोंद केलेली नाही. दुसर्‍या लाटेत वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी वाढल्याचे सरकारने मान्य केले.

कॉंग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल यांनी सरकारला विचारले होते की, दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेमुळे कोविड-19  रुग्ण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आणि रुग्णालयात मरण पावले, हे खरे आहे काय? त्यास उत्तर देताना आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी सांगितले, आरोग्य हा राज्याचा विषय आहे. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेश नियमितपणे मृत्यूची नोंद करताना, विस्तृत मार्गदर्शक सूचनांनुसार नियमितपणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे रुग्ण प्रकरणे आणि मृत्यूची नोंद करतात. विशेषत: ऑक्सिजनच्या अभावामुळे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही.

राज्यसभेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कोविड-19 मुळे देशभरात होणाऱ्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. सरकार याबाबत माहिती लपवत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, 'सरकारला आमचा प्रश्न आहे की तुम्ही आकडेवारी का लपवत आहात? कोविड-19 मुळे किती लोकांनी प्राण गमावले आहेत ते सांगा. सरकारी अधिकृत आकडेवारीत जितकी मृतांची संख्या नोंदविली जात आहे, त्यापेक्षा बरीच जास्त संख्या अहवालात सांगितली जात आहे. (हेही वाचा: डेल्टा प्लस प्रकार हा अल्फा प्रकाराच्या तुलनेत 40-60 टक्के अधिक संसर्गजन्य- INSACOG चे सह-अध्यक्ष डॉ.एन.के.अरोरा)

दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी विरोधकांनी पेगॅसस स्पायवेअरच्या मुद्यावर बराच गोंधळ घातला. वाढत्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेची कार्यवाही गुरुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. 21 जुलै रोजी बकरीदला सार्वजनिक सुट्टी आहे, त्यानंतर आता 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ही कार्यवाही सुरू होईल.