Coronavirus: भारत या आठवड्यात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णसंख्येत 10 लाखांचा टप्पा पार करेल- राहुल गांधी
Rahul Gandhi | (Photo Credit: Facebook)

देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची वाढत्या संख्येवरुन काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तसेच, या आठवड्यात भारतातील कोरोना व्हायरस रुग्णसंख्या 10 लाखाचा टप्पा पार करेन असे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी एक वृत्त शेअर करत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'या आठवड्यात आपल्या देशात कोरोना रुग्णांची संख्या 10,00,000 टप्पा पार करेन'. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने आगोदरच इशारा दिला आहे की, निर्णायक कारवाई करण्यास सरकार असमर्थ ठरले तर कोरोना व्हायरस महामारी स्थिती अधिकाधीक वाईट होत जाईल.

देशातील कोरोना व्हायरस विद्यमान स्थितीबाबत बोलायचे तर, केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 9 लाखांहून अधिक झाली आहे. गेल्या आठवड्यात प्रतिदिन सर्वाधिक 20,000 पेक्षाही अधिक रुग्णसंख्या वाढते आहे. देशात सुमारे 23,000 पेक्षाही अधिक लोकांचा कोरोना व्हायरस संकटामुळे मृत्यू झाला आहे. तर प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या आणि उपचार घेऊन बरे झालेल्या (डिस्चार्ज मिळालेल्या) रुग्णांच्या संख्येत सुमारे अडीच लाखांपेक्षा अधिक अंतर आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरमध्ये शेअर केलेल्या वृत्तामध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे टेडरोस एडहानोम गेब्रेयेसुस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांची प्रतिक्रिया आहे. या प्रतिक्रियेत गेब्रेयेसुस म्हणता की, मला ठामपणे सांगावेसे वाटते की, जगभरातील अनेक देश चुकीच्या दिशेने जात आहेत. आपल्या हाती असलेल्या सर्व उपयांचे पालन योग्य पद्धतीने करणे हेच आपल्या हाती आहे. यात कुचराई केली तर कोरोना व्हायरस महामारीला परतवून लावण्याऐवजी स्थिती अधिक बिकट होऊ शकते. (हेही वाचा, अर्थव्यवस्थेवरील संकटाबाबत बोललो तेव्हा भाजप आणि प्रसारमाध्यमांनी माझी खिल्ली उडवली;)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 9 लाखांहून अधिक झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 28,498 नवे कोरोना रुग्ण आढलले आहेत. 553 रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील कोरोना व्हायरस संक्रमित एकूण रुग्णांची संख्या 9,06,752 इतकी झाल आहे. यात रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 3,11,565 उपचार घेऊन बरे झालेल्या आणि त्यामुळे रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) मिळालेल्या 5,71,460 तसेच मृत्यू झालेल्या 23,727 रुग्णांचा समावेश आहे.