Coronavirus Scare: गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने रद्द केल्या 10 गाड्यांच्या 35 फेऱ्या; जाणून घ्या संपूर्ण यादी
Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

कोरोना विषाणूचा (Corona Virus) वाढता प्रादुर्भाव पाहता सरकार अनेक उपाययोजना राबवत आहे. देशातील विविध शहरांत महत्वाच्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. अशात मध्य रेल्वेने (Central Railway) आपल्या अनेक रेल्वेगाड्या काही कालावधीकरिता रद्द करण्याला निर्णय घेतला. त्यानंतर आता पश्चिम रेल्वेनेही (Western Railway) आपल्या काही गाड्या रद्द केल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या 10 गाड्यांच्या 35 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुख्यत्वे हमसफर एक्सप्रेस आणि दुरांतो एक्सप्रेसचा समावेश आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने सध्या जमावबंदीचा आदेश काढला आहे. गर्दीच्या ठिकाणी या विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. मध्य रेल्वेने महाराष्ट्रात येणार्‍या रद्द केलेल्या गाड्यांची संख्या 23 आहे. त्यातील काही मार्च अखेरपर्यंत तर काही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेने रद्द केलेल्या गाड्यांमध्ये 10 गाड्या व 35 फेऱ्यांचा समावेश आहे. तसेच कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दक्षिण रेल्वेने 17 ट्रेन रद्द केल्याची माहती ट्विटरद्वारे जाहीर केली आहे. दुसरीकडे कोरोना व्हायरसमुळे स्थानकांवर गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत अनेक शहरांतील रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत 50 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सध्या दुसर्‍या टप्प्यात आहे, ही बाब विचारात घेऊन आतापर्यंत देशातील गाड्या व अन्य मार्गाने प्रवास करण्याची साधने तशीच चालू आहेत. मुंबई आणि पुण्यात प्रशासनाने पुढील 15 दिवस नागरिकांनी ‘आत्म-शिस्त’ पाळावी असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तरी मुंबईमधील लोकल सेवा चालू राहणार आहे. मात्र सरकार करत असलेल्या उपाय योजनांना नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही, तर काही कठोर पावले उचलावी लागतील असे त्यांनी सांगितले. (हेही वाचा: मध्य रेल्वेने रद्द केल्या अनेक रेल्वे; डेक्कन एक्सप्रेस, निझामाबाद एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेसचा समावेश, जाणून घ्या पूर्ण यादी)

दरम्यान, मुंबई (Mumbai) आणि पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) मंगळवारी प्रत्येकी एका व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळले. आता राज्यात संक्रमितांची संख्या 41 झाली आहे.