Mukesh Ambani (Photo Credit: File Photo)

कोरोना व्हायरस (Coronavirus) या साथीच्या आजारासाठी लढा देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतेच लोकांना पीएम केअर फंडामध्ये दान करण्याचे आवाहन केले होते. यानंतर अक्षय कुमार, रतन टाटा यांच्यासह अनेकांनी यात कोट्यावधी रुपयांची देणगी दिली. आता मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीने (Reliance Industries) पीएम केअर फंड (PM CARES Fund) मध्ये 500 कोटींची घोषणा केली आहे. याशिवाय रिलायन्स महाराष्ट्र आणि गुजरातच्या मुख्यमंत्री मदत निधीला 5-5 कोटी रुपये देणार आहे. सोबतच कंपनीकडून येत्या 10 दिवसांसाठी 5 लाख लोकांना अन्नदानही केले जाणार आहे.

अशाप्रकारे सुमारे 50 लाख लोकांना अन्न देण्यात येणार आहे. यापूर्वी रिलायन्स फाउंडेशनने अवघ्या 2 आठवड्यांत 100 बेडचे कोव्हीड-19 रुग्णालय तयार केले होते. यासह रिलायन्स 1 लाख मास्क आणि हजारो पीपीई वैयक्तिक संरक्षक उपकरणे तयार करीत आहे. देशातील आरोग्य कर्मचार्‍यांना याचा फायदा होणार आहे. रिलायन्स याआधीच आपत्कालीन वाहनांमध्ये विनामूल्य इंधन आणि डबल डेटा प्रदान करीत आहे.

याबाबत बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. मुकेश अंबानी म्हणाले, ‘आम्हाला खात्री आहे की, कोरोनो विषाणूच्या आपत्तीवर लवकरात लवकर विजय मिळविला जाईल. रिलायन्स इंडस्ट्रीजची संपूर्ण टीम संकटांच्या या काळात देशासोबत आहे व कोरोना व्हायरसविरुद्धचा हा लढा जिंकण्यासाठी सर्वोतोपरी मदत करेल.’ (हेही वाचा: Coronavirus संकटकाळात मदतीसाठी धावला सलमान खान; 25 हजार कामगारांसाठी आर्थिक मदत घोषित)

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी म्हणाल्या, ‘कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी जसा संपूर्ण देश एकत्रित आला आहे, तसेच रिलायन्स फाउंडेशन आपल्या देशवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपले डॉक्टर आणि कर्मचार्‍यांनी भारताचे पहिले कोरोना व्हायरस रुग्णालय स्थापन करण्यास मदत केली आहे आणि कोविड 19 ची तपासणी, चाचणी, प्रतिबंध आणि उपचारात सरकारला सहकार्य करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.’