Cycling | Representational Image | (Photo Credits: AFP)

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातून (Maharashtra) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आपल्या मूळ गावी सायकलने निघालेल्या मजूराचा वाटेतच मृत्यू झाला आहे. शुक्रवार (1 मे) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बारवानी (Barwani) येथे या मजूराने प्राण सोडले. हा मजूर महाराष्ट्रातील भिवंडी (Bhiwandi) येथून सायकलवर निघाला होता. सायकल चालवून अखेर तो थकला आणि वाटेतच कोसळला. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मजूराला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी जी धनगर (G Dhangar) यांनी दिली आहे. (वर्धा: 350 किलोमीटरच्या पायपिटीनंतर मजुराने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा)

कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका टाळण्यासाठी 24 मार्च रोजी देश लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा वेग मंदावला असला तरी अनेक स्थलांतरित कामगार, रोजंदारी मजूर यांसमोर असंख्य प्रश्न उभे राहिले. लॉकडाऊन काळात उद्योगधंदे, व्यवसाय बंद असल्याने बेरोजगार झालेल्या मजूर, कामगारांसमोर दोन वेळेच्या अन्नाचा, निवाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक ठप्प असल्याने घरी परतण्याचा मार्ग देखील बंद झाला. त्यामुळे अनेकांनी मिळेल त्या मार्गाने घर गाठण्याचा प्रयत्न केला. कोणी पायी तर कोणी सायकलने घरीची वाट धरली. (Lockdown: लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या विद्यार्थी, पर्यटक, प्रवासी, नागरिकांसाठी विशेष 'श्रमिक' ट्रेन सुरु; जाणून घ्या तिकीट बुकींग करण्याची पद्धत)

लॉकडाऊनचा कालावधी अजून दोन आठवड्यांसाठी वाढवण्यात आला आहे. मात्र स्थरांतरित मजूरांना त्यांच्या राज्यात परतण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारकडून विशेष श्रमिक ट्रेन्सची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील विविध ठिकाणी अडकलेल्या मजूरांचा परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र श्रमिक ट्रेनमधून आपल्या गावी परतण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.