कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन (Lockdown) घोषित करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये विविध शहरात अनेक मजूर (Labourer) अडकले आहेत. यातील काहींनी पायपीट करत घराकडे धाव घेतली आहे. तर काही मजूर आजही शहरात अडकून पडले आहेत. अशातचं वर्धा जिल्ह्यामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. हैदराबाद ते गिरड असा 350 किलोमीटरचा प्रवास करून हताश झालेल्या एका मजुराने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे.
अमरसिंह मडावी (वय 40 वर्षे) असं या मजुराचं नाव होते. अमरसिंह हे हैदराबाद येथे बांधकामाच्या साइटवर काम करत होते. परंतु, लॉकडाऊनमुळे काम थांबल्यामुळे त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. अमरसिंह यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पायी जाण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी 350 किलोमीटरचा प्रवास करत वर्ध्यातील गिरड हे ठिकाण गाठले. वाटेत त्यांना एका ट्रकचा आधार मिळाला. काही वेळानंतर हा ट्रक नाश्त्यासाठी थांबला. यावेळी अमरसिंह लघुशंकेसाठी गेला. मात्र, ट्रक त्याठिकाणावरून निघून गेला. या अनोळखी जागेमुळे अमरसिंह हताश झाला. त्यानंतर अमरसिंहने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. (हेही वाचा - राजस्थान मधील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन 74 बसेस पुण्यात दाखल; स्वारगेट बस स्थानकात होणार स्क्रिनिंग)
दरम्यान, नागपूर-वर्धा सीमेवर गिरड परिसरात अजय झाडे या शेतकऱ्याने यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. मृतदेहाजवळ मोबाईल सापडल्याने पोलिसांना मृत व्यक्तीची ओळख पटणे शक्य झाले.