धक्कादायक! 6 राज्यांमध्ये 87 हजारापेक्षा अधिक आरोग्य कर्मचा-यांना Coronavirus ची लागण; महाराष्ट्र अव्वल  
Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

देशभरात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या घटनांमध्ये आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि गुजरात या 6 राज्यांमधील तब्बल 87,000 हून अधिक आरोग्य कर्मचा-यांना (Healthcare Workers) कोरोनाची लागण झाली. आतापर्यंत 573 आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये 28 ऑगस्टपर्यंत 1 लाखाहून अधिक आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली आहे. कोविड-19 बाबत आतापर्यंत सर्वाधिक, 7.3 लाख रुग्णांची पुष्टी झालेल्या महाराष्ट्रात आरोग्य सेवेतील 28 टक्के कामगार संक्रमित आहेत आणि एकूण मृत्यूंपैकी 50 पेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. कर्नाटकमध्ये 12,260, तामिळनाडूमध्ये 11,169 आणि महाराष्ट्रातील 24,000 हून अधिक आरोग्य कर्मचारी संक्रमित झाले आहेत. या आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये परिचारिका, डॉक्टर आणि आशा कामगारांचा समावेश आहे. त्याचबरोबर मृत्यूच्या बाबतीत महाराष्ट्रात 292, कर्नाटकमध्ये 46 आणि तामिळनाडूमध्ये 49 कर्मचारी मृत्यूमुखी पडले आहेत. कोरोना आरोग्य कर्मचार्‍यांमधील एकूण प्रकरणांपैकी 55% या तिन्ही राज्यांत आहेत. आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये वाढत्या संसर्गाची प्रकरणे ही  केंद्रासाठी चिंतेचा विषय बनली आहेत.

गुरुवारी कॅबिनेट सचिवांच्या आढावामध्ये सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधे, मास्क आणि पीपीई किटची उपलब्धता आणि वापर यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. एकीकडे आरोग्य कर्मचार्‍यांच्या मृत्यूच्या आकड्यांमध्ये वाढ होत असताना, सरकारला आतापर्यंत केवळ 143 क्लेम पेपर्स मिळाले आहेत, ज्याद्वारे त्यांना कोरोना वॉरियर विमा योजनेंतर्गत निधी देता येईल. अहवालानुसार, अधिकृत सूत्रांनी माहिती दिली की मृत्यूची वास्तविक संख्या आणि क्लेम यांच्यात मोठा फरक असू शकतो, कारण यामध्ये अशा अनेकांचा मृत्यू झाला आहे जे विमा नियमांमध्ये बसत नाहीत. (हेही वाचा: भारतात आजपर्यंत 4 कोटींहून अधिक COVID19 च्या चाचण्या पार पडल्याची आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची माहिती)

दरम्यान, शुक्रवारी, महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 14,361 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि यासह संक्रमित लोकांची संख्या 7,47,995 झाली आहे.