Luv Agarwal | (Photo Credits-ANI)

देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या आता 35 हजारांच्याही वर पोहोचली आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस संकट निपटण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्यासोबतच आरोग्य मंत्रालय (India Health Ministry) आणि इंडियन काऊन्सील फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) खांद्याला खांदा लाऊन लढत आहेत. मात्र, अलिकडील काही काळात आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआर यांच्यात काही कारणांनी मतभेद असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून येत आहे.

 

कोरोना व्हायरस आकडेवारीवरुन दोन्ही संस्थांमध्ये काही मतभेद असल्याचा दावा काही संकेतस्थळांनी केला आहे. दरम्यान, आयसीएमआर आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांच्या नियमित होणाऱ्या पत्रकार परिषदेतही काही वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित दिसत आहेत. ही उपस्थितीही प्रसारमाध्यमांतून चर्चेचा विषय ठरली आहे. ICMR सुरुवातीपासूनच दररोज केल्या जाणाऱ्या कोरोना टेस्ट आणि त्यातून समोर आलेली पॉझिटीव्ह रुग्णांची आकडेवारी, मृत्यू आणि डिस्चार्ज आदींची माहिती देत असे. मात्र, अलिकडे ही माहिती देणे काहिसे कमी करण्यात किंवा थांबविण्यात आले आहे.

विशेष म्हणजे कोरोना व्हायरस उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआर यांच्यात नियमितपणे संयुक्त पत्रकार परिषद घेतली जात असे. या पत्रकार परिषदेत नियमित ब्रिफींग दिले जाते. जेणेकरुन प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेला कोरोना व्हायरस संकट नियमित स्थिती माहिती होईल. मात्र, गेल्या गुरुवारपासून आयसीएमआरचे अधिकारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबत पत्रकार परिषदेत दिसले नाहीत. त्यामुळे केवळ आरोग्य मंत्रालयाचे अधिकारीच पत्रकार परिषदेत सहभागी होताना दिसत आहेत. (हेही वाचा, भारतातील COVID-19 Hotspots नुसार राज्यातील जिल्हे आणि शहरांची रेड, ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये विभागणी; येथे पाहा संपूर्ण यादी)

जनसत्ता डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, आयसीएमआरने काही दिवासांपूर्वी सांगितले होते की, देशात कोरोना व्हायरसचे एकूण 16365 रुग्ण आहेत आणि आयसीएमआरच्या माहितीनुसार एका दिवसात 2154 नवे रुग्ण मिळाले आहेत. तर त्याच दिवशी आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसा देशात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 14792 होती. आणि त्या एका दिवसात कोरोनाचे 957 नवे रुग्ण सापडले होते. या फरकानंतर विरोधी पक्षांनी सरकारला चांगलेच घेरले. तेव्हापासून आयसीएमआरचे आकडेच पुढे आले नाहीत.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 35043 इतकी आहे. यात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या 25007, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्ण 8888 आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1147 लोकांचाही समावेश आहे. देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 35,043 इतकी आहे. त्यातील विदेशी रुग्णांची संख्या 111 इतकी आहे.