Coronavirus In Supreme Court: सर्वोच्च न्यायालयातील 50% कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरस संसर्ग, न्यायाधीशांचे 'वर्क फ्रॉम होम'; व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून होणार सुनावणी
Supreme Court | (Photo Credit: ANI)

देशात प्रचंड मोठ्या संख्येने वाढत असलेला कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणापलीकडे जातो की काय? अशी स्थिती आहे. कोरोना व्हायरसने आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयातही ( Supreme Court)  मोठ्या प्रमाणावर शिरकाव केला आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुमारे 50% कर्मचारी हे कोरना व्हायरस संक्रमित झाले आहेत. त्यामुळे आता न्यायाधीशही 'वर्क फ्रॉम होम' (Work From Home) करणार आहेत. न्यायालयात पार पडणाऱ्या सुनावणी आता व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून पार पडणार आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाची इमारत सॅनिटाईज करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.

कोरोना व्हायरस संसर्ग वाढल्याचे लक्षात येताच तातडीने पावले टाकली जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाची ईमारत पूर्णपणे निर्जंतूकीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सर्व खटल्यांच्या आज होणाऱ्या सुनावणी निर्धारीत वेळेपेक्षा अर्धा तास उशीरा सुरु होणार आहे. (हेही वाचा, महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगडमध्ये कोरोनाचा उद्रेक; केंद्र सरकारचे तिन्ही राज्यांना पत्र)

भारतात कोरोना व्हायरस संक्रमणाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर आली आहे. त्यामुळे देशभरात कोरोना संक्रमितांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्राललाने सोमवारी (12 एप्रिल) दिलेल्या आकडेवारीनुसार पाठिमागील 24 तासात कोरोना व्हायरस संक्रमितांचे 1,68,912 लाख नवे रुग्ण देशभरात आढळून आले आहेत. 75,086 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 904 जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात कोरोना व्हायरस संक्रमितांची ही वाढलेली सर्वात अधिक संख्या आहेत. सोबतच कोरोना व्हायरस संक्रमितांची आजवरची एकूण संख्या 1,35,27,717 इतकी झाली आहे. उपचार घेऊन बरे झालेल्यांची आजवरची संख्या 1,21,56,529 इतकी आहे. तर आतापर्यंत कोरोना व्हायरस या जीवघेण्या आजाराने देशात 1,70,179 जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण देशात सक्रिय असलेले रुग्ण 12,01,009 इतके आहेत.

महाराष्ट्र, दिल्ली छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश यांसह देशभरातील इतर राज्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या वाढत आहे. कोरोना व्हायरस संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी शासन-प्रशासन प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करते आहे. अद्याप तरी त्याला यश येताना दिसत नाही.