Coronavirus in Lakshadweep: जवळजवळ 1 वर्षानंतर केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये आढळला कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण; संपर्कात आलेले 14 लोक पॉझिटिव्ह
Coronavirus scanning at an airport (Photo Credit: PTI)

जवळजवळ गेल्या एक वर्षांपासून भारत कोरोना विषाणू (Coronavirus) साथीशी लढत आहे. भारतामधील प्रत्येक राज्यात विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे. मात्र केंद्र शासित प्रदेश (Union Territory) लक्षद्वीप (Lakshadweep) अजूनतरी यापासून सुरक्षित होते. आता लक्षद्वीपमध्ये सोमवारी कोरोना व्हायरसची पहिली घटना उघडकीस आली आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, 18 जानेवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण लक्षद्वीपमध्ये आढळून आला. ही व्यक्ती 4 जानेवारी रोजी कोचीहून आली होती. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 31 लोकांचा शोध घेण्यात आला सून त्यांना वेगळे ठेवले गेले आहे.

अहवालानुसार या 31 पैकी 14 जणांचा तपास अहवाल कोरोनासाठी सकारात्मक आला आहे. दुसरीकडे, या 14 लोकांच्या संपर्कात आलेल्या 56 जणांना शोधून काढण्यात आले आणि त्यांनाही आयसोलेशनमध्ये ठेवले गेले आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, इंडिया रिझर्व्ह बटालियनचा सैनिक पहिल्यांदा संक्रमित असल्याचा आढळला, जो 3 जानेवारी रोजी कोचीहून कवरत्तीला रवाना झाला होता. यापूर्वी लक्षद्वीपमध्ये संसर्गाची एकही घटना घडली नव्हती. आता इथे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रसार झाल्याने प्रशासन खडबडून जागे होऊन सतर्कतेच्या मोडमध्ये आले आहे.

(हेही वाचा: कोव्हॅक्सिन संदर्भात भारत बायोटेकने जारी केल्या मार्गदर्शक सूचना; सांगितले कोणी घेऊ नये ही लस)

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्रशासनाने मंगळवारपासून उड्डाणांसह सर्व आंतर-बेट हालचाली रद्द केल्या आहेत. दरम्यान, देशात कोरोनाचा संसर्ग एकीकडे कमी होत आहे, तर दुसरीकडे, कोरोनाच्या लसीकरण मोहीमेनेही वेग पकडला आहे. 16 जानेवारीपासून सुरु झालेल्या या लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून आतापर्यंत चार दिवसांत 6 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 6,31,417 लोकांना लसी देण्यात आल्या आहेत.