Coronavirus in India: कोरोना बाधितांच्या संख्येत भारताने ओलांडला 30 लाखांचा टप्पा; 69,239 नव्या रुग्णांच्या मोठ्या भरीसह 912 जणांचा मृत्यू
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 24 तासांत पडलेल्या मोठ्या भरीमुळे देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 30 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आज 69,239 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 912 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 30,44,941 वर पोहचला आहे. त्यापैकी 7,07,668 सक्रीय रुग्ण (Active Cases) असून 22,80,567 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात एकूण 56,706 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Ministry of Health) देण्यात आली आहे.

देशात अॅक्टीव्ह रुग्णांपेक्षा कोरोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आपला रिकव्हरी रेट सातत्याने सुधारत आहे. तर मृत्यू दर कमी होत आहे. जगातील सर्वात चांगला रिकव्हरी रेट आणि सर्वात कमी मृत्यू दर भारताचा असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. (महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार! राज्यात आज 14,492 नव्या कोरोनाग्रस्तांची भर, तर 297 जणांचा मृत्यू)

ANI Tweet:

कोरोना व्हायरस संकटामुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. त्यामुळे कोरोनाच्या लसीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील लसीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. देशातील कोविड-19 ची लस क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. तसंच या वर्षअखेरीपर्यंत ही लस तयार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.