कोरोना विषाणूचा (Coronavirus) उद्रेक दिवसेंदिवस वाढतच आहे. हळू हळू भारतालाही याचा फटका बसत असलेला दिसत आहे. नुकतेच केरळमधील (Kerala) एकाच घरातील 5 जणांचा कोरना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे भारतातील कोरोना संसर्गाची एकूण संख्या 40 वर पोहचली आहे. या रूग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे पाचही लोक पटणमथिट्टा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. यासंदर्भात आरोग्यमंत्री म्हणाले की, त्यातील तीन जण 29 फेब्रुवारीला इटलीहून परत आले होते, तर अन्य दोघे त्यांचे नातेवाईक आहेत.
या सर्व संक्रमित लोकांना वेगळे ठेवण्यात आले असून, त्यांना पटणमथिट्टा सामान्य रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवले गेले आहे. या सर्वांना शनिवारी रात्री विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली. यापूर्वी राज्यात तीन जणांना या विषाणूची लागण झाली होती. कोरोनाव्हायरसमुळे सर्वाधिक पीडित चीनच्या वुहानमध्ये, वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या या तिन्ही विद्यार्थ्यांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले.
आरोग्यमंत्री के.के. शैलजा म्हणाले की, कुटुंबातील सदस्यांनी विमानतळावर त्यांच्या इटली भेटीचा तपशील दिला नव्हता, त्यामुळे त्यांची तपासणी झाली नाही. आता ज्या पाच लोकांचा तपास अहवाल सकारात्मक आला आहे, यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. केरळ व्यतिरिक्त दिल्ली, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातही कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. चीनपासून सुरू झालेल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या एक लाख इतकी झाली आहे. या विषाणूमुळे सुमारे 3500 लोक मरण पावले आहेत.
दुसरीकडे, केरळमधील कोझिकोड जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या काही भागात बर्ड फ्लूची पुष्टी केली आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पश्चिम कोडियाठूर परिसराजवळ शेकडो पक्षी वेगवेगळ्या शेतात मृत आढळले होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असत, त्यांना बर्ड फ्लूची पुष्टी झाल्याचे आढळले. आता जिल्हा प्रशासनाने बाधित क्षेत्राच्या एक किमीच्या परिघात सर्व पक्षी आणि कोंबड्या मारण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: आता प्राण्यांनाही कोरोना व्हायरसचा धोका; Covid-19 ची लागण झालेल्या व्यक्तीच्या कुत्र्यालाही झाला Coronavirus)
दरम्यान, कोरोना विषाणूमुळे शनिवारी इटलीमध्ये (Italy) आणखी 36 जणांचा मृत्यू झाला. यासह, देशात या विषाणूमुळे मृत्यूची संख्या वाढून 233 झाली आहे. कोरोना विषाणूमुळे सर्वात जास्त मृत्यू चीनमध्ये आणि नंतर इटलीमध्ये झाले आहेत. या व्हायरसचा फटका अनेक बड्या कंपन्यांनाही बसला आहे. फेसबुकने (Facebook) शुक्रवारी सांगितले की, ते लंडन आणि सिंगापूर येथील कार्यालय बंद करत आहेत.