Satyendar Jain | Image: PTI

मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांना सध्या तुरुंगातच राहावे लागणार आहे. राऊस अॅव्हेन्यू कोर्ट 18 जून रोजी त्यांच्या जामीन अर्जावर निर्णय देणार आहे. आप सरकारमधील दिल्लीचे आरोग्य मंत्री असलेले सत्येंद्र जैन ईडीच्या छाप्यामुळे कायदेशीर कारवाईला सामोरे जात आहेत. त्यांच्या ठिकाणाहून लाखोंची बेहिशेबी संपत्ती सापडली असून, त्यांच्यावर हवालाद्वारे पैसे गोळा केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ईडीने एक आश्चर्यकारक दावा केला आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात ईडीने सांगितले की, चौकशीदरम्यान सत्येंद्र जैन यांनी त्यांना सांगितले की, कोविडमुळे त्यांची स्मरणशक्ती गेली आहे त्यामुळे ते सध्या स्पष्ट काही सांगू शकणार नाहीत.

मंत्री जैन यांना ईडीने हवाला पैशाबाबत विचारणा केली होती. हवालाकडून पैसे मिळवणाऱ्या ट्रस्टशी सत्येंद्र यांचा काय संबंध? ते त्याचा सदस्य आहेत का? असे हे प्रश्न होते. या प्रश्नांना उत्तर देताना जैन यांनी आपण स्मरणशक्ती गमावल्याचे सांगितले. सत्येंद्र जैन यांना ईडीने 30 मे रोजी अटक केली होती. त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता आणि मनी लाँड्रिंगचा आरोप होता. मंत्री सत्येंद्र जैन यांनी पत्नी आणि मुलींच्या नावावर 16 कोटींची फसवणूक केल्याचा दावा ईडीने केला होता. (हेही वाचा: राहुल गांधींची सुमारे दहा तास चौकशी, उद्या पुन्हा राहावं लागेल चौकशीसाठी हजर)

जैन, त्यांची पत्नी पूनम आणि इतरांविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैन यांनी दिल्लीत अनेक शेल कंपन्या स्थापन केल्याचा किंवा खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यांनी 54 शेल कंपन्यांच्या माध्यमातून कोलकाता येथील तीन हवाला ऑपरेटर्सकडून 16.39 कोटी रुपयांचा काळा पैसा हस्तांतरित केला आहे, असा आरोप आहे.

आता सत्येंद्र जैन यांनी हवाला-कागदपत्रांबाबत चौकशीदरम्यान कोविडमुळे त्यांची स्मरणशक्ती गेल्याचे सांगितले. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ट्रायल कोर्टाला याबाबत माहिती दिली. सत्येंद्र जैन यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला असून, 18 जून रोजी न्यायालय निर्णय सुनावणार आहे.