विधानसभेच्या सत्रात अश्लील व्हिडिओ पाहताना दिसले कॉंग्रेस MLC; गदारोळ माजल्यानंतर दिले 'हे' स्पष्टीकरण
Prakash Rathod (Photo Credits: Twitter)

कर्नाटकच्या राजकारणात सध्या कॉंग्रेसचे नेते आणि एमएलसी प्रकाश राठोड (Prakash Rathod) चर्चेत आहेत. एक व्हायरल व्हिडिओ क्लिप हे यामागचे कारण आहे. विरोधकांचा आरोप आहे की राठोड त्यांच्या मोबाइलवर अश्लील क्लिप पहात होते, जी आता सार्वजनिक झाली आहे. राठोड यांचे असे वागणे हे सभागृहाच्या सन्मानाविरूद्ध आहे, अशा परिस्थितीत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. विधान परिषदेमध्ये एखाद्या नेत्याला अश्लील व्हिडिओ पाहताना पकडले गेले असल्याचे हे पहिलेच उदाहरण नाही, यापूर्वीही विधान परिषदेत अनेक नेते अश्लील व्हिडिओ पाहताना आढळले आहेत.

कर्नाटक कॉंग्रेसचे एमएलसी प्रकाश राठोड यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. क्लिपमध्ये, एमएलसी त्यांच्या मोबाइल फोनवर स्टोरेज क्लिअर करताना दिसत आहेत. यादरम्यान, इतर क्लिप्समध्ये त्यांच्या फोनवर काही अश्लील क्लिप्स देखील दिसल्या. परंतु, राठोड यांनी त्या क्लिपवर क्लिक न करता ते फोनवर सर्फिंग करत पुढे गेले. परंतु स्थानिक चॅनेलवर कॉंग्रेसच्या नेत्याने असे करताना हा व्हिडिओ प्रसारित झाला व गदारोळ माजला.

आता याबाबत स्पष्टीकरण देताना राठोड म्हणाले की, ‘जे आरोप केले जात आहेत त्यामध्ये सत्यता नाही. मी कोणताही व्हिडिओ पहात नव्हतो. प्रश्नोत्तराच्या वेळी, माझा प्रश्न क्रमांक 7 होता. मी एक संदेश पाहण्याचा प्रयत्न करीत होतो. माझे मोबाइल स्टोरेज भरले होते म्हणून मी काही संदेश डिलीट करण्याचा प्रयत्न करत होतो. काही टीव्ही चॅनल्सनी जे दिसले ते रेकॉर्ड केले आणि दावा केला की मी काही आक्षेपार्ह कंटेंट पहात होतो.’ या घटनेनंतर एमएलसी प्रकाश राठोड यांनी सर्वांना सत्य दाखवा असे आवाहन केले आहे. (हेही वाचा: मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णयः 'एकटी व्यक्ती झटापट केल्याशिवाय बलात्कार करू शकत नाही', आरोपीची निर्दोष मुक्तता)

याबाबत भाजपचे प्रवक्ते एस प्रकाश म्हणाले की, मी कॉंग्रेसचे एमएलसी प्रकाश राठोड यांना निलंबित करण्याची मागणी करतो. त्यांनी राजीनामा द्यावा. दरम्यान, याआधी भाजप नेते लक्ष्मण सावडी हेदेखील राज्य विधानसभेत अश्लील कंटेंट पाहताना पकडले गेले होते. त्यांच्यासमवेत पक्षाचे अन्य दोन मंत्री केसी पाटील आणि कृष्णा पालकर हेदेखील अश्लील व्हिडिओ पाहताना कॅमेरामध्ये कैद झाले होते. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.