विविध राज्यांमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यासाठी सण, उत्सवांचे निमित्त मोठ्या प्रमाणावर साधले जात आहे. आगामी काळात तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 (Tamil Nadu Assembly Election 2021) पार पडत आहेत. त्यामुळे तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यात पोंगल सणानिमित्त (Pongal Festival) साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रीय पक्ष, संघटनांचे राष्ट्रीय नेते हजेरी लाऊ लागले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांनी तमिळनाडू राज्यात जाऊन जलीकट्टू या खेळाचा आनंद घेतला. जलीकट्टू खेळाच्या निमित्ताने तामिळनाडूची परंपरा पाहायला मिळाली, अशी प्रतिक्रियाही राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) हे आगोदरपासूनच चेन्नई येथे आहेत. ते दोन दिवसांच्या चेन्नई दौऱ्यावर आहेत. त्यांन आज (14 जानेवारी) सकाळी पोन्नियमानेडु येथील श्री कादुंबड़ी चिन्नामन मंदिर येथे पोंगल प्रार्थना केली. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील तामिळनाडू राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते चेन्नई येथे नम्मा ओरु पोंगल कार्यक्रमात सहभागी होत आहेत. (हेही वाचा, Rahul Gandhi On Farm Laws: देशात लोकशाही केवळ कागदोपत्री, पंतप्रधान केवळ उद्योगपतींसाठी काम करतात- राहुल गांधी)
जलकट्टू खेळाचा आनंद घेताना राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली की, या खेळाच्या निमित्ताने आपल्याला तामिळनाडू राज्याची परंपरा समजली. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर जलीकट्टू हा खेळ अत्य्ंत सुरक्षीतपणे आयोजित करण्यात आला याचा विशेष आनंद असल्याचेही राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्यासोबत द्रमुक युवा प्रदेश सचिव उदयनिधी स्टालिन, काँग्रेस संघटन महासचिव केसी वेणुगोपाल प्रदेशाध्यक्ष के एस अलगिरी आणि पुड्डुचेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी उपस्थित होते.
तामिळनाडू राज्यात एप्रिल-मे 2021 मध्ये विधानसभा निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत द्रमुक आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी हे नुकतेच विदेश दौऱ्यावर गेले होते. विदेशातून नुकतेच मायदेशी परतलेल्या राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली आहे.