Representational Image (Photo Credits: File Image)

काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या (Tamil Nadu) कोइम्बतूर (Coimbatore) जिल्ह्यात एका गर्भवती महिलेवर चालत्या ट्रेनमध्ये बलात्काराचा प्रयत्न झाला. तेव्हा तिला याला प्रतिकार केल्याने तिला ट्रेनमधून फेकून देण्यात आले. ही महिला कोइम्बतूर-तिरुपती इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेनने तिरुप्पूरहून आंध्र प्रदेशातील चित्तूरला जात होती. आता पुन्हा एकदा कोइम्बतूर जिल्ह्यातून अशीच एक  धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी दोन शाळकरी मुली आणि एका शाळकरी मुलावर पाच किशोरांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. महत्वाचे म्हणजे आरोपींपैकी 4 जण अल्पवयीन मुले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. ही घटना पोल्लाची जवळील एका गावात घडली.

या प्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आणि 18 वर्षीय तरुणाला अटक केली. धक्कादायक म्हणजे, आरोपींनी हा जघन्य गुन्हा कॅमेऱ्यात रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी क्लिप्स देखील जप्त केल्या आहेत. वृत्तानुसार, गेल्या काही महिन्यांत गावातील आणि आसपासच्या भागात एकाकी ठिकाणी चार अल्पवयीन आणि एक तरुण अशा पाच आरोपींनी पाच वेळा शाळकरी मुलांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. सर्व आरोपी शाळा सोडलेले आहेत आणि रोजंदारीवर काम करतात. ते अनेकदा त्यांच्या मोबाईल फोनवर पॉर्न पाहत होते.

अहवालानुसार, जेव्हा शाळकरी मुले लैंगिक कृत्यात सहभागी होण्यास नकार देत असत तेव्हा पाचही आरोपी त्यांना काटेरी झुडपांनी मारहाण करायचे. कथित विद्यार्थी गरीब कुटुंबातील आहेत. त्यांच्या कुटुंबाला शुक्रवारी सकाळी ही बाब कळली. विशेष म्हणजे, पिडीत मुलांचे कुटुंब तक्रार दाखल करू इच्छित नव्हते. मात्र गावातील काही लोकांनी चाइल्डलाइन (1098) शी संपर्क साधला आणि ही बाब कळवली. त्यानंतर पोलिसांनी चार अल्पवयीन मुले आणि एका तरुणाविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO) च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. (हेही वाचा: Kerala Shocker: घृणास्पद! केरळच्या कोल्लममध्ये वडिलानेच केला अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार)

शुक्रवारी संध्याकाळी, चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पाचवा आरोपी अजूनही फरार आहे. या आरोपीला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. तीन अल्पवयीन आरोपींना कोइम्बतूर शहरातील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे, तर 18 वर्षीय तरुणाला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे आणि सध्या तो कोइम्बतूर मध्यवर्ती कारागृहात आहे.