नागरिकत्त्व सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर ईशान्य भारतामध्ये तणावाची स्थिती; इंटरनेट बंद, कर्फ्यू लागू तर विमानसेवा ठप्प
Army troopers in Assam | File Image | (Photo Credits: PTI)

नागरिकत्त्व सुधारणा विधेयक (Citizenship Amendment Bill)  लोकसभेनंतर काल (11 डिसेंबर) रात्री राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर आता त्याचे पडसाद ईशान्य भारतात दिसायला सुरूवात झाली आहे. दरम्यान सध्या नागरिकत्त्व सुधारणा विधेयकाविरोधात आसाममध्ये आंदोलन करण्यात आलं आहे. तर मणिपूर, आसाम या भागामध्ये जमावबंदी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला त्रिपूरा, मिझोराम, मणिपूर, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला असून अनिश्चित कालावधीसाठी कर्फ्यू देखील लावण्यात आला आहे. Citizenship Amendment Bill सरकारची कसोटी पाहणारं नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक नेमकंं आहे काय?

दरम्यान ईशान्य भारतातील तणावग्रस्त स्थिती पाहता केंद्र सरकारकडून काळजी घेतली जात आहे. पोलिसांनी जादा कुमक मागवली असून काल रात्रीपासूनच काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. पण त्यासोबतच स्पाईसजेट, विस्तारा, इंडिगो कंपन्यांनी आसामला जाणारी विमानं 13 डिसेंबर पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

तणावग्रस्त परिस्थिती पाहता आसाम रायफल्स आणि सैन्य दलाच्या तुकड्यादेखील दाखल करण्यात आल्या आहेत. लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार वेळोवेळी स्थानिक परिस्थिती पाहून कर्फ्यू काढायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे. दरम्यान आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं असे आवाहन आसाम पोलिसांकडून करण्यात आले आहे.