Chhattisgarh: 'बाटलीत लघवी भरून त्याने हात धुवा'; रुग्णांनी सॅनिटायझर मागितले असता चिडलेल्या सचिवाने दिला धक्कादायक सल्ला- Report
Coronavirus | (Photo Credits: PixaBay)

देशात कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्याच्या विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये तर, रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्य सेवा कोलमडली आहे. सर्वसामान्यांना योग्य वेळी उपचार मिळेनासे झाले आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे लोकांना मदत करण्याऐवजी अधिकारीही जनतेशी उद्धटपणे वागत आहेत. अशीच एक घटना छत्तीसगडच्या (Chhattisgarh) धमतरीमधून समोर आली आहे. येथील कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रूग्णांनी पंचायत सेक्रेटरीला सॅनिटायझर व साबण मागितला तेव्हा सेक्रेटरीने रूग्णांना मूत्र वापरायचा सल्ला दिला.

पंचायत सचिवांच्या अशा वृत्तीने संतप्त झालेल्या लोकांनी कोविड केंद्रात जोरदार गोंधळ घातला. टीव्ही9 हिंदीने याबाबत वृत्त दिले आहे. ही बाब धमतरीच्या लटियारा पंचायतची आहे. इथल्या कोविड सेंटरच्या आयसोलेशन विभगात 6 रूग्ण ठेवले आहेत. 2 ते 3 दिवसांपूर्वी रुग्णांना साबण आणि सॅनिटायझरची बाटली देण्यात आली होती. मात्र ती संपल्यावर रुग्णांना साबण किंवा सॅनिटायझर देण्यात आले नाही. याबाबत तक्रार करतांना फोनवर रुग्णांनी पंचायत सचिवांकडे स्वच्छताविषयक सुविधा देण्याची मागणी केली. त्यावेळी सेक्रेटरी संतप्त झाला व त्याने लोकांना अपमानास्पद वागणूक दिली.

कोविड सेंटरमधील रूग्णांची तक्रार आहे की, त्यांनी पंचायत सचिवांकडे सॅनिटायझर आणि साबण मागितला असता, त्यांनी रागाच्या भरात सांगितले की, रुग्णांनी एका बाटलीत मूत्र भरावे व ते सॅनिटायझर म्हणून वापरावे. हे ऐकून संतप्त रूग्णांनी केंद्रात गोंधळ घातला. ही बाब वाढल्यानंतर सचिवाने आपली चूक कबूल केली आणि लोकांची माफी मागितली. (हेही वाचा: काय सांगता? Covid-19 पासून दूर राहण्यासाठी शेणाने व गोमुत्राने अंघोळ; डॉक्टरांनी वर्तवला Mucormycosis संसर्गाचा धोका (Watch Video)

दरम्यान, गेल्या 24 तासात छत्तीसगडमध्ये 9717 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत व 199 लोकांचा मृत्यू झाला आहे. रायपूर जिल्ह्यात सर्वाधिक 33 लोक मरण पावले आहेत. 12440 रुग्ण काल बरे झाले असून सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 121836 झाली आहे.