कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गापासून वाचण्यासाठी जितकी काळजी घ्यावी तितकी थोडी आहे. याआधी एकाच ठिकाणी अनेक संक्रमित रुग्ण आढळल्याचा घटना घडल्या आहेत, आता त्यामध्ये एजून एकाची भर पडली आहे. चेन्नईच्या (Chennai) पंचतारांकित हॉटेलमध्ये कोरोना व्हायरसचे क्लस्टर समोर आले आहे. वृत्तानुसार, आयटीसी ग्रँड चोला (ITC Grand Chola) येथे एका शेफसह 85 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. आयटीसी ग्रँड चोलाचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय असे मिळून 609 नमुने घेण्यात आले होते आणि त्यापैकी 85 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
मिरर नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, आरोग्य सचिवांनी याची पुष्टी केली की 15 डिसेंबर रोजी या हॉटेलच्या मुख्य स्वयंपाकघरातील एक शेफची कोरोना विषाणू चाचणी सकारात्मक आली होती. याबाबत चेन्नई कॉर्पोरेशनचे उपायुक्त (आरोग्य) एस दिव्याधर्शिनी यांनी सांगितले की, ही घटना समोर आल्यानंतर त्यांनी आयटीसी ग्रँड चोलाला 10 दिवसांसाठी सर्व मेजवान्या रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ते इतरही सर्व लक्झरी हॉटेलमध्ये चाचण्या करणार आहेत.
घडलेल्या प्रकाराबाबत पंचतारांकित हॉटेलने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आमचे अतिथी आणि सहकारी यांचे आरोग्य आणि सुरक्षा आमच्यासाठी फार महत्वाची आहे. आमच्या हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या आवश्यक नियमांचे पालन होत आहे तसेच आम्ही स्वत: सॅनिटेशन व हायजीन प्रोटोकॉलचीही अंमलबजावणी करत आहोत.’ (हेही वाचा: नव्या वर्षात भारतीयांना अजून एक भेट; Bharat Biotech ची स्वदेशी लस 'कोव्हॅक्सिन'ला मंजुरी देण्याची समितीची शिफारस)
त्यांनी पुढे सांगितले, ‘आमच्या इथे सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होत आहे. स्वयंपाकघराची स्वच्छता ठेवली जात आहे आणि सहकार्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे. अशाप्रकारे सर्व सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाय सावधपणे पाळले जात आहेत.’