Kedarnath Temple (Photo Credits: Wikimedia Commons)

सोमवारी सकाळपासून सतत सुरु असलेला पाऊस आणि मुसळधार पावसाचा इशारा मिळाल्याने केदारनाथ यात्रा (Kedarnath Yatra) तात्पुरती थांबवावी लागली आहे. ही माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, भाविकांना मंदिरात न जाण्याचा आणि हॉटेलमध्ये परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रुद्रप्रयागचे सर्कल ऑफिसर प्रमोद कुमार म्हणाले की, ‘सोमवारी सकाळपासून ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे. पावसामुळे आम्ही पादचाऱ्यांना थांबवून त्यांना हॉटेलमध्ये परत जाण्याची विनंती करत आहोत.’

अशाप्रकारे उत्तराखंडमधील अचानक बदललेल्या हवामानामुळे आता चारधाम यात्रेला ब्रेक लागला आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या ऑरेंज अलर्टनंतर प्रशासनाने केदारनाथ यात्रा थांबवली असून भाविकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर हेलिकॉप्टर सेवाही काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने तत्काळ कारवाई करत 5 हजार भाविकांना गुप्तकाशीतच थांबवले आहे. यासोबतच सर्व भाविकांच्या सुरक्षेची व्यवस्थाही करण्यात येत आहे.

सध्या हवामान आणखी बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे रस्ता अधिक धोकादायक बनू शकतो. याशिवाय दरड कोसळण्याचा धोकाही वाढला आहे. केदारनाथसह आसपासच्या भागात रविवारपासूनच हवामान खराब होऊ लागले, जे सोमवारी आणखीनच बिघडले. सोमवार सकाळपासून पावसाच्या धारा सुरु आहेत. येत्या काळात पावसाचा जोर वाढू शकतो, अशा स्थितीत प्रवास करणे धोकादायक ठरू शकते, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. (हेही वाचा: मान्सूनपूर्व पाऊस का पडतो? मान्सूनच्या पावसापेक्षा तो कसा वेगळा आहे? जाणून घ्या)

दरम्यान, या महिन्यात गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडल्यानंतर चारधाम यात्रेला सुरुवात झाली. केदारनाथचे दरवाजे 6 मे रोजी तर बद्रीनाथचे दरवाजे 8 मे रोजी उघडण्यात आले होते. छोटा चारधाम हे हिंदू धर्मातील हिमालय पर्वतांमधील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे भारताच्या उत्तराखंड राज्याच्या गढवाल विभागातील उत्तरकाशी, रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्ह्यांमध्ये स्थित आहेत. यामध्ये बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री स्थानांचा समावेश होतो.