Centre appoints new Governors in 6 states:लालाजी टंडन मध्य प्रदेशचे राज्यपाल, फागू चौहान-बिहार, जगदीप धनखड - पश्चिम बंगाल तर, रमेश बैस यांच्याकडे त्रिपूराची जबाबदारी
Anandiben Patel, Jagdeep Dhankhar, Lal Ji Tandon (Photo Credits: PTI/Twitter)

Centre appoints new Governors in 6 states: केंद्र सरकारने बिहार आणि मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्याच्या राज्यपालांची नव्याने नियुक्ती केली आहे. बिहारचे राज्यपाल लालाजी टंडन (Lal Ji Tandon)  यांच्याकडे मध्य प्रदेश राज्याची जबाबदारी सोपवली आहे. तर, बिहारचे राज्यपाल म्हणून लालाजी टंडन यांच्या जागी फागू चौहान (Phagu Chauhan) यांची नियुक्त करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपालपद आनंदीबेन पटेल (Anandiben Patel)  यांच्याकडे तर पश्चिम बंगाल राज्याचे राज्यपालपद जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तर, याचप्रमाणे त्रिपूराचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) हे असणार आहेत.

लालाजी टंडन यांचा जन्म 12 एप्रिल 1935 मध्ये झाला होता. ते भाजपचे एक वरिष्ठ नेता आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजकीय निवृत्तीनंतर ते  लखनऊ येथून 2009 मध्ये खासदार म्हणून निवडूण आले होते. उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीय राहणारे लालाजी टंडन हे प्रदेश भाजपच्या सरकारमध्ये मंत्रीही होते.

लालाजी टंडन यांचा राजकीय प्रवास 1960 पासून सुरु झाला. मायावती आणि कल्याण सिंह यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी नगर विकास मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. काही वर्षे विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी कामगिरी केली आहे. लालाजी टंडनी यांनी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातही सक्रीय सहभाग घेतला होता.

एएनआय ट्विट

बिहारचे राज्यपाल फागू चौहान हे पूर्व उत्तर प्रदेश राज्यातील आजमगढ येथील मुळचे रहिवासी आहेत. त्यांची राजकीय वाटचाल ही समाजवादी विचारांची राहिली आहे. दलित मजदूर किसान पार्टीच्या तिकीटावर ते पहिल्यांदा आमदार बनले होते. सध्या ते मऊ जिल्ह्यातील घोसी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. सन 2017 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच या जागेवरुन विजय मिळवला होता. 2017 च्या निवडणुकीत त्यांनी बसपा उमेदवारास 7 हजार मतांनी पराभूत केले होते.

दरम्यान, राज्यपालपदी नियुक्त झालेले सर्व चेहरे जेव्हापासून आपला पदभार स्वीकारतील तेव्हापासून त्यांचा राज्यपाल म्हणून कार्यकाळ सुरु होईल.