Budget 2019: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांच्या प्रकृतीअस्वास्थ्यामुळे केंद्रातील एनडीए प्रणीत पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा (BJP Government) विद्यमान सत्ताकाळातील अंतींम अर्थसंकल्प सादर करण्याची संधी कॅबिनेट मंत्री पियूष गोयल यांना मिळाली. गोयल यांनी 1 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर ठेवला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पावर जोरदार प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. पाहा अर्थसंकल्पावर कोणी काय दिली प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी: सर्वांना सर्व काही देणारा अर्थसंकल्प
अर्थमंत्री पियूष गोयल यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे तोंड भरुन कौतुक करत पंतप्रधान मोदींनी अरुण जेटली आणि पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ ट्रेलर आहे. आगामी निवडणुकीनंतर आम्ही देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणार आहोत. या अर्थसंकल्पात याची चुणूक दिसली आहे. हा अर्थसंकल्प गोरगरीब आणि मध्यमवर्गियांना दिलासा देणारा आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी बळ देणारा असा आहे. या अर्थसंकल्पामुळे श्रमजीवी वर्गाचा सन्मान करण्यात आला आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह: निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सादर केलेला अर्थसंकल्प
या अर्थसंकल्पातून जनतेला फारसे काही मिळाले नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सादर केलेला अर्थसंकल्प अशी या अर्थसंकल्पाचे वर्णन करता येईल. हा अर्थसंकल्प केवळ निवडणुकीशी संबंधीत आहे. त्याचा परिणाम मे महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकीवरही दिसेल. मध्यमवर्ग आणि ग्रामिण जनतेला सुखावणारा असा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाच्या दृष्टीने सरकारने जनतेला गिफ्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. पण, शेतकरी आणि मध्यमवर्गाचा निवडणुकीशी संबंध आहे. त्यामुळे 'निवडणूक अर्थसंकल्प' अशीच या अर्थसंकल्पाची ओळख होते, असे मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष: अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांचा अपमान
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारने शेकऱ्यांचा अपमान केला आहे. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारने शेततकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. या पैशाचा एकूण हिशोब काढला तर, सरकार शेतकऱ्यांना 17 रुपये देऊ करते. खरेतर हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. गेल्या पाच वर्षात सरकारने शेतकऱ्याला उद्धस्त करण्याचेच काम केले आहे, अशी टीका राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे. (हेही वाचा, Rail Budget 2019: अंतरिम बजेटमधून रेल्वेला काय मिळालं?)
शशी थरुर, माजी परराष्ट्रमंत्री: अर्थहीन अर्थसंकल्प
अर्थसंकल्पात काहीही अर्थ नाही. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबाबत केलेल्या घोषणांकडे लक्ष दिले असता हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना प्रति मिहिना केवळ 500 रुपये देतो. पण, इतक्या अत्यल्प मदतीने शेतकऱ्यांचा मान राखला जाऊ शकतो? असा सवाल माजी परराष्ट्रमंत्री आणि काँग्रेस नेते शशी थरुर यांनी विचारला आहे. पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या मंडळींना दिलेली करसवलत वगळता या अर्थसंकल्पात काहीही नाही, अशी टीका शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी केली आहे.