Brutal Murder of Wife: पत्नीचे कापलेले डोके हातात घेऊन परिसरात फिरत राहिला पती; Valentine's Day दिवशी समोर आली हत्येची धक्कादायक घटना
Brutal Murder of Wife

Brutal Murder of Wife: पश्चिम बंगालमधील (West Bengal) पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील पातशपूरमध्ये बुधवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून केला आणि नंतर तिचे कापलेले शीर घेऊन तो परिसरात फिरत राहिला. गौतम गुचैत असे या आरोपीचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आरोपी गौतम गुचैत याने आधी पत्नी फुलराणी गुचैतचा देशी बनावटीच्या चाकूने शिरच्छेद करून खून केला आणि नंतर तिचे कापलेले डोके व हत्याकांडात वापरलेले हत्यार घेऊन तो घराबाहेर पडला. त्यानंतर तो एका स्थानिक चहाच्या स्टॉलवर पोहोचला व बराच वेळ तिथल्या बाकावर बसला.

ही बाब समोर आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. काही लोकांनी याचा व्हिडिओही बनवला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यानंतर गावातील काही लोकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचे डोके आणि शरीर जप्त केले आणि आरोपी पतीला अटक केली. महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आरोपीकडून या हत्येमागची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. (हेही वाचा: Madhya Pradesh Shocker: आनंदावर दुखाचा डोंगर, मुलींच्या लग्नाच्या तीन दिवस आधी वडिलांचा अपघाती मृत्यू)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्येची घटना 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.45 वाजता घडली. गौतम गुचैत हा जिल्ह्यातील पातशपूर पोलीस स्टेशन हद्दीतील चिस्तीपूर पूरबा गावचा रहिवासी आहे. घरगुती वादातून त्याने पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर आरोपी पत्नीचे कापलेले शीर घेऊन चिस्तीपूर बसस्थानकावर पोहोचला. सुमारे तासभर डोके हातात घेऊन इकडे-तिकडे भटकत राहिला. सध्या पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे. त्याने हा गुन्हा का केला याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र, गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली होती.