Prashant Kishor | (Photo Credits: Facebook)

निवडणूक रणनीतीकार आणि भारतीय राजकीय कृती समितीचे (I-PAC) प्रमुख प्रशांत किशोर (Prashant Kishor) 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना एकत्र करण्यात व्यस्त आहेत. अशात त्यांचे एक विधान सध्या चर्चेत आहे. प्रशांत किशोर म्हणाले आहे की, पुढील अनेक दशके भारतीय जनता पक्षाचे (BJP) राजकारणातील स्थान मजबूत असेल. 40 वर्षांपूर्वी ज्या प्रकारे काँग्रेस (Congress) सत्तेचे केंद्र होते, त्याचप्रमाणे भाजपही सत्तेच्या केंद्रस्थानी राहणार असल्याचे किशोर म्हणाले. भलेही मग ते निवडणूक जिंकू अथवा हारू. गोव्यातील एका कार्यक्रमादरम्यान मान्यवरांशी संवाद साधताना किशोर यांनी हे भाकीत केले.

किशोर यांना विश्वास आहे की काँग्रेस आणि इतर पक्षांना ‘अनेक दशके’ भाजपशी लढावे लागेल. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर एकदा का 30 टक्के मते मिळाली की तो पक्ष राजकीय वर्तुळातून सहजा सहजी बाहेर जात नाही. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या निवेदनात प्रशांत किशोर म्हणाले की, भारतीय राजकारणात भाजप अनेक दशकांपर्यंत सत्तेच्या केंद्रस्थानी राहील. राहुल गांधींबद्दल प्रशांत किशोर म्हणाले की, त्यांना जे वाटते ते होणार नाही. कदाचित काही वेळातच लोक नरेंद्र मोदींना सत्तेवरून दूर करतील असे त्यांना वाटत असेल, पण तसे होणार नाही. जोपर्यंत तुम्हाला मोदींच्या ताकदीची कल्पना येत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांचा पराभव करण्यासाठी त्यांचा सामना करू शकणार नाही.

किशोर पुढे म्हणाले की, ‘लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाराज आहेत आणि त्यांना सत्तेतून हाकलून देतील खोट्या भ्रमात राहू नका. भलेही लोक मोदींना सत्तेतून बाहेर काढतील, परंतु पण भाजप आता कुठेच जाणार नाही. अनेक दशके हा पक्ष सत्तेच्या केंद्रस्थानी असेल.’ (हेही वाचा: India on 99-Year Lease: BJP प्रवक्त्या Ruchi Pathak यांना ट्रोल झाल्यावर उपरती, '99 वर्षांच्या करारावर भारताला स्वातंत्र्य' विधानाबाबत दिले स्पष्टीकरण)

दरम्यान, याआधी बातमी होती की, प्रशांत किशोर लवकरच काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत आणि त्यांनी सोनिया गांधींव्यतिरिक्त राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली होती. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत वरिष्ठ नेत्यांकडून मत मागवले होते. परंतु चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतरही असे होऊ न शकल्याने आता प्रशांत किशोर पुन्हा एकदा टीएमसीसोबत काम करत आहेत.