देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections 2024) तयारी जोरात सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) नव्या घोषवाक्याची घोषणा केली आहे. 'तीसरी बार मोदी सरकार, अब की बार 400 पार' असे हे भाजपचे घोषवाक्य आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासह भाजपने लोकसभा आणि विधानसभा स्तरावर निमंत्रक आणि सहसंयोजक निश्चित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा लवकरच संपूर्ण देशाचा दौरा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 22 जानेवारीपासून पंतप्रधान मोदींचा दौरा सुरू होणार आहे.
मंगळवारी (2 जानेवारी) नवी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी भाजपने घोषवाक्याची घोषणा केली. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, पक्षाचे सरचिटणीस सुनील बन्सल, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, मनसुख मांडविया यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
याआधी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 'अच्छे दिन आनेवाले हैं' असा नारा दिला होता. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुका 'फिर एक बार मोदी सरकार' या घोषणेवर पक्षाने लढवल्या होत्या. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा दोन्ही निवडणुका जिंकल्या होत्या. पीएम मोदींनी अलीकडच्या काळात अनेकवेळा दावा केला आहे की, भाजपवर लोकांचा विश्वास कायम आहे. अशा स्थितीत भाजपची विजयाची हॅट्ट्रिक असेल. (हेही वाचा: Central Government On Women Employees Nominate: महिला कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन प्रक्रियेत नवी सुधारणा, पतीऐवजी मुलांचे नाव लावता येणार, घ्या जाणून)
दरम्यान, ब्रँड मोदींनी अनेक विधानसभा आणि दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळवून दिला आहे. मोदींनी नेहमीच निवडणुकीची जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्यांची प्रतिमा आणि नावावर जनादेश मागितला आहे. सरकारी योजना आणि पक्षाच्या कार्यक्रमांतून त्यांची ब्रँड इमेज समाजातील प्रत्येक घटकावर उमटली आहे. 2024 ची सार्वत्रिक निवडणूक ही एक प्रकारे 'मोदींची निवडणूक असेल, कारण ते शासन आणि पक्षाच्या प्रचारात आघाडीवर आहेत.