Devendra Fadnavis (Photo Credit : ANI)

BJP New President: भाजपचा नवा अध्यक्ष (BJP President) कोण होणार? 2024 च्या लोकसभा निवडणुकीपासून हा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्याचे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा मोदी 3.0 मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यानंतर भाजपच्या नव्या अध्यक्षाच्या नावाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. सर्व नावांवर अंदाज बांधल्यानंतर आता महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जेपी नड्डा यांची जागा घेऊ शकतात, असे मानले जात आहे. फडणवीस यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर, देवेंद्र फडणवीस भाजपचे नवे अध्यक्ष होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भाजपच्या उच्चपदस्थ सूत्रांनी बुधवारी रात्री फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, पक्षाच्या हायकमांडने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. फडणवीस येत्या आठवड्यात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन, नवी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. बुधवारी दिवसभरात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याची माहिती देण्यात आली.

काही दिवसांपूर्वीच नवी दिल्लीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत नीती आयोगाच्या अधिकृत बैठकीनंतर, पंतप्रधानांनी भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पक्षाच्या मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीनंतर पंतप्रधानांनी केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजून एक बैठक घेतली. याब भेटीनंतर फडणवीस कुटुंबीयांना पंतप्रधानांसोबत फोटो ऑपही देण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मुंबईहून नवी दिल्लीला हलवण्याबाबतचा निर्णय पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांच्यात बैठकीत घेण्यात आला आणि त्यानंतर काही दिवसांत पक्षांतर्गत मतांवर चर्चा झाल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे नेतृत्व कोण करणार, हा आता पक्षांतर्गत चर्चेचा प्रश्न आहे. विधानसभा निवडणुका संपेपर्यंत फडणवीस महाराष्ट्रातच राहतील आणि नंतर नवी दिल्लीला जातील, असा एक मतप्रवाह आहे. नवी दिल्लीतील ताज्या इनपुटवरून असे सूचित होते की, फडणवीस हे अपेक्षेपेक्षा लवकर नवी दिल्लीला जाऊ शकतात. (हेही वाचा: New Maharashtra Governor: महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून CP Radhakrishnan यांनी घेतली शपथ; जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही महत्वाच्या बाबी)

देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यांच्याशिवाय ते अमित शहा यांच्याही जवळचे आहेत. देवेंद्र फडणवीस यांची आरएसएसमध्येही चांगली पकड आहे. मोहन भागवत यांचेही ते जवळचे असून ते स्वतः नागपूरचे आहेत. यामुळे ते पक्ष आणि संघ यांच्यातील दुवा म्हणूनही काम करू शकतात. या कारणास्तव ते परिपूर्ण उमेदवार मानले जात आहेत. फडणवीस दिल्लीला गेल्यानंतर महाराष्ट्राच्या नेतृत्वासाठी नवी दिल्लीतील सूत्रांकडून एक नाव येत आहे ते म्हणजे पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे. परंतु याबाबत पुष्टी होऊ शकली नाही.