
भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक (National Executive Meeting) 2 जुलैपासून तेलंगणाची राजधानी हैदराबाद (Hyderabad) येथे होणार आहे. पक्षाच्या सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी ही पक्षाची एक प्रमुख निर्णय घेणारी संस्था आहे, ज्यामध्ये देशभरातील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. आता या दोन दिवसीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह पक्षाचे सर्व मोठे नेते उपस्थित राहणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी हैदराबादची निवड करण्यात आली आहे, कारण भाजप हा सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीचा (टीआरएस) प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून समोर आला आहे. महाराष्ट्रानंतर आता भाजपची नजर दक्षिणेकडील राज्यांवर आहे. हैदराबाद येथील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत 2024 च्या लोकसभा आणि त्यापूर्वी होणाऱ्या तेलंगणासह सर्व विधानसभा निवडणुकांबाबत रणनीती आखली जाणार आहे.
आतापर्यंत तेलंगणासह दक्षिण भारताचे राजकारण कुटुंबावर आधारित होते. तेलंगणातील केसीआर असोत, आंध्रमधील जगन रेड्डी असोत किंवा तामिळनाडूतील करुणानिधी कुटुंब असो, या राज्यांचे राजकारण त्यांच्याभोवती फिरत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकारिणीला संबोधित करताना कुटुंबवाद आणि कौटुंबिक राजकीय पक्षांवर हल्ला चढवू शकतात. पंतप्रधानांनी सर्वत्र राजकारणातील कुटुंबवादाच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे आणि हे समाजासाठी घातक असल्याचे म्हटले. (हेही वाचा: P Chidambaram on 5 years of GST: जीएसटी रकमेवरुन पी चिदंबरम यांचा मोदी सरकारवर घणाघात)
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या 2 दिवस आधीपासून 119 कार्यकारिणी सदस्यांना स्थानिक नेत्यांच्या घरी 48 तास आणि 2 रात्र घालवण्यासाठी राज्यातील 119 विधानसभा मतदारसंघात तैनात करण्यात आले आहे, यावरून तेलंगणाबाबत भाजपचे गांभीर्य समजू शकते. स्थानिक पातळीवरून खरा अभिप्राय गोळा करणे हा त्यामागील पक्षाचा उद्देश असून, सर्वच विधानसभेत राष्ट्रीय नेत्यांच्या दोन दिवसांच्या मुक्कामामुळे स्थानिक नेते आणि पक्षाच्या घटकांचाही आत्मविश्वास वाढणार आहे.
2 जुलै रोजी दुपारी 3 वाजता सुरू होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा सकाळी 10 वाजल्यापासून आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. 2 जुलै रोजी दुपारी 3 वाजता होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह पक्षाचे सर्व दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
हैद्राबाद येथील परेड ग्राऊंडवर होणाऱ्या भव्य रॅलीने कार्यकारिणीचा समारोप होईल. परेड ग्राऊंडवरील या मेळाव्याला प्रचंड जनसमुदाय जमवण्यासाठी भाजप प्रदेश युनिटने सर्व ताकद पणाला लावली आहे. या मेळाव्यात 4-5 लाख लोकांना जमवण्याची रणनीती आखण्यात आल्याचे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.