मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) एका सुप्रसिद्ध शाळेतील तीन वर्षांच्या मुलीवर स्कूल बसच्या चालकाने अत्याचार (Rape) केला आहे. या लहान मुलीने जेव्हा ही माहिती तिच्या पालकांना दिली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलीला अजूनही वाईट आणि चांगल्या स्पर्शाचा अर्थ माहित नाही, अशावेळी तिच्याबर बलात्कार झाला आहे. पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली असता त्यांनी अंतर्गत चौकशी करून बस चालकाला क्लीन चिट दिली. स्कूल बसमध्ये चालकाने नर्सरीच्या मुलीवर बलात्कार केला आहे.
याप्रकरणी सोमवारी पालकांनी गुन्हा दाखल केला. या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या जघन्य गुन्ह्यात बसमधील महिला परिचरही चालकासोबत होती. महिला असूनही परिचारिकेने या गोष्टीला विरोध केला नाही. एवढेच नाही तर मुलीचे कपडे बदलून तिला घरी सोडले. मुलगी घरी पोहोचल्यावर आई-वडिलांनी बदललेल्या कपड्यांचे कारण विचारले असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला.
प्रकरण भोपाळच्या रतीबाद भागात असलेल्या लोकप्रिय शाळेचे आहे. प्रथम कुटुंबीयांनी शाळेत जाऊन याबाबत तक्रार केली, त्यानंतर व्यवस्थापनाने घडला प्रकार नाकारला. परंतु मुलीने आरोपी ड्रायव्हरला ओळखून तिच्यासोबत झालेला प्रकार व्यवस्थापनाला सांगितल्यावर, व्यवस्थापनाने तपासाच्या नावाखाली बहाणा करून चालकाला क्लीन चिट दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. एसीपी महिला सुरक्षा निधी सक्सेना यांनी मुलीचे समुपदेशन केले, त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत मुलीसोबत गैरवर्तन झाल्याची पुष्टी झाली.
पोलीस आयुक्त मकरंद देऊस्कर सांगतात की, आत्तापर्यंतच्या तपासात असे आढळून आले आहे की, जेव्हा बस मुलांना घरी सोडण्यासाठी येते तेव्हा त्या बसमध्ये जवळपास 12 मुले होती. मुलीचे घर येईपर्यंत सर्व मुले उतरली होती व बसमध्ये चालक, महिला परिचर आणि मुलगी हे तिघेच होते. मुलगी एकटी आहे हे पाहून चालकाने तिच्यावर बलात्कार केला. (हेही वाचा: 42 वर्षीय महिलेची हत्या करून आरोपीने पीडितेच्या मृतदेहावर केला बलात्कार, नराधमाला अटक)
सध्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्यावर IPC चे कलम-376 AB लागू करण्यात आले आहे, जे 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या बालात्कारशी संबंधित आहे. यामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते. यासोबतच पॉक्सो कायद्याच्या कलम 5/6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.