Bhopal: अंडरगार्मेंट्सची चोरी केली म्हणून दाम्पत्याने 17 वर्षांच्या मुलाला खोलीत डांबले; युवकाने केली आत्महत्या, गुन्हा दाखल 
Representational Image (Photo Credits: ANI)

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये (Bhopal) अंडरगार्मेंट्स (Undergarments) चोरी आणि त्यानंतर आत्महत्येचे (Suicide) धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एका जोडप्याने 17 वर्षाच्या मुलाला त्यांचे अंडरगार्मेंट्स चोरी करून पळ काढल्याचे पहिले. त्यानंतर या कपलने मुलाला एका खोलीत डांबून ठेवले. नंतर त्यांनी मुलाविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पाचारण केले. पोलिस आल्यानंतर खोली उघडली असता खोलीत युवकाचा मृतदेह आढळला. या मुलाने आत्महत्या केली होती. यानंतर या दाम्पत्याविरूद्ध आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भोपाळच्या गांधी नगर परिसरातील आहे. तिथे हा 17 वर्षांचा मुलगा आपल्या चुलतभावासोबत राहण्यासाठी आला होता. शनिवारी रात्री शेजार्‍यांनी या मुलाला अंडरगार्मेंट्ससची चोरी करताना पहिले. 24 वर्षीय रवी आणि त्याच्या पत्नीने 17 वर्षाच्या मुलाचा पाठलाग केला. हा मुलगा त्याच्या चुलतभावाच्या घरातील एका खोलीत लपला होता.

घटनेची माहिती देताना गांधी नगरचे एसएचओ अरुण शर्मा म्हणाले, या जोडप्याने युवकाला खोलीत बंद केले आणि त्याच्या चुलतभावाला आणि पोलिसांना बोलावले. पोलिस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी दरवाजा उघडला असता तरुणाचा मृतदेह आढळून आला. या मुलाने चोरी केलेले अंडरगारमेंट्सही घटनास्थळावरून जप्त करण्यात आले आहेत. युवकाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या युवकाच्या चुलतभावाच्या तक्रारीवरून कपलविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा (सेक्शन 306) गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा: Delhi: पतीसोबतचे भांडण पोहचले शिगेला, संतप्त पत्नीकडून पोटच्या मुलाची हत्या)

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. शवविच्छेदनानंतर युवकाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतरच रविवारी कुटुंबाने मुलाचे अंत्यसंस्कार करण्यास सहमती दर्शविली. दुसरीकडे, त्या जोडप्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, दाम्पत्याला त्यावेळी जे योग्य वाटले ते त्यांनी केले. आता त्यांना मुद्दाम त्रास दिला जात आहे. पोलिसांनी या तरुणाला पकडावे म्हणूनच त्यांनी त्याला खोलीत डांबले होते.