प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) काळात सरकारने अनेक लोकांकडून अनेक बाबतींद्वारे दंड वसूल केला आहे. आता बंगळूरू (Bengaluru) येथील एका भाजी विक्रेत्याकडून वसूल केलेल्या दंडाची सोशल मिडियावर चर्चा सुरु आहे. शुक्रवारी दुपारी माडीवाला पोलिस स्टेशन जंक्शन येथे हेल्मेट न घालता गाडी चालवणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी पकडले. ही व्यक्ती दंड भरू न शकल्याने या व्यक्तीला आपली स्कूटर पोलीस स्टेशनमध्येच ठेऊन जावावी लागली. तर पोलिसांना तपासणीमध्ये आढळले की या व्यक्तीला मेपासून तब्बल 77 वेळा वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल चालान (Challan) देण्यात आले आहे.

या एकूण दंडाची रक्कम 42,500 रुपये इतकी आहे. ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमांचे उल्लंघन करणारा इसम 30 वर्षीय अरुण कुमार आहे. पोलिसांनी सांगितले की, त्याने मागील वर्षी वापरलेली स्कूटर (होंडा डीओ) विकत घेतली होती. या गाडीद्वारेच त्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. यामध्ये हेल्मेट न घालणे, चुकीची नंबर प्लेट याशिवाय वाहतुकीच्या लेनच्या शिस्तीचे उल्लंघन अशा गोष्टींचा समावेश आहे.

नियमांच्या अंमलबजावणीसाठी उपनिरीक्षक शिवराजकुमार अंगडी आणि त्यांची टीम माडीवाला पोलिस स्टेशन जंक्शन येथे तैनात करण्यात आली होती. त्यांना कुमार हा हेल्मेटशिवाय आपल्या स्कूटरवरून प्रवास करताना आढळला. त्यांनी त्याला रोखले आणि त्याच्या पूर्वीच्या उल्लंघनांची तपासणी करण्यासाठी डिव्हाइसवर कुमारच्या वाहनाचा नोंदणी क्रमांक प्रविष्ट केला. त्यावेळी पोलिसांना कुमारने 77 नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले. त्याच्या एकूण दंडाची किंमत 42, 500 रुपये इतकी होती.

इतकी मोठी रक्कम त्यावेळी कुमारकडे नव्हती त्यामुळे पैशांची व्यवस्था करण्यासाठी त्याने काही दिवसांचा अवधी मागितला. त्यानंतर पोलिसांनी त्याचे वाहन जप्त केले. आता कुमारला आपले वाहन परत मिळवण्यासाठी कोर्टाकडे दंडाची रक्कम भरावी लागेल.