
येत्या 31 मार्च 2025 रोजी, ईद-उल-फितरची (Eid Ul Fitr 2025) सार्वजनिक सुट्टी, तसेच मार्चचा म्हणजेच आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असूनही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सर्व एजन्सी बँकांना त्यांच्या शाखा उघड्या ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. हा निर्णय वित्तीय वर्ष 2024-25 च्या अखेरीस सरकारी व्यवहारांचे सुरळीत आणि योग्यरित्या लेखांकन सुनिश्चित करण्यासाठी घेतला आहे. अशाप्रकारे 31 मार्च 2025 रोजी सर्व बँका करदात्यांच्या सोयीसाठी उघड्या राहणार आहेत. एजन्सी बँका म्हणजे आरबीआयद्वारे अधिकृत बँका, ज्या सरकारी आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन करतात.
31 मार्च रोजी, या बँकांच्या शाखा सरकारी व्यवहारांसाठी उघड्या राहतील, ज्यामध्ये आयकर, वस्तू आणि सेवा कर (GST), सीमाशुल्क, उत्पादन शुल्क यांसारख्या करांचे देयक समाविष्ट आहे. तसेच, पेन्शन देयके, सरकारी अनुदाने, सरकारी पगार आणि भत्ते यांचे वितरण, आणि सरकारी योजनांशी संबंधित सार्वजनिक व्यवहार देखील या दिवशी पूर्ण केले जातील. मात्र या दिवशी सर्वसाधारण ग्राहकांसाठी इतर बँकिंग सेवा उपलब्ध असतील की नाही, हे संबंधित बँकांच्या धोरणांवर अवलंबून असेल. त्यामुळे, आपल्या बँकेशी संपर्क करून 31 मार्च रोजी उपलब्ध असलेल्या सेवांबद्दल आधीच माहिती घेणे उचित आहे. (हेही वाचा: 8th Pay Commission Eligibility: आठव्या वेतन आयोगासाठी कोण पात्र आहे? संपूर्ण माहिती)
आरबीआयच्या या निर्देशामुळे वित्तीय वर्षाच्या शेवटच्या दिवशी सरकारी व्यवहारांचे सुरळीत आणि योग्य लेखांकन सुनिश्चित होईल, ज्यामुळे आर्थिक व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल. चालू आर्थिक वर्षात सरकारी पावत्या आणि देयकांचा हिशेब सुलभ करण्यासाठी, देशभरात विशेष क्लिअरिंग ऑपरेशन्स करण्यासाठी आवश्यक व्यवस्था देखील करण्यात आली आहे. करदात्यांना त्यांच्या कर देय रकमेबाबत त्यांचे व्यवहार आधीच पूर्ण करण्याचे आवाहन केले जाते. याव्यतिरिक्त, 1 एप्रिल 2025 रोजी वार्षिक खाते बंदीमुळे बहुतेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. मात्र, मेघालय, छत्तीसगड, मिझोराम, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशातील बँका या दिवशी उघड्या राहतील.