सार्वजनिक क्षेत्रातील (Public Sector) बँकांच्या विलिनिकरणामुळे आणि जमा झालेल्या रक्कमेवरील व्याजदर घटवल्याने काही कर्मचाऱ्यांच्या युनियनने आज (22 ऑक्टोबर) देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे आज बँक बंद राहणार असून ग्राहकांना बँकेचे कोणतेही व्यवहार करता येणार नाही आहेत. एसबीआयसह अन्य काही बँकांनी या संपाबाबत यापूर्वीच ग्राहकांना सुचना दिली होती.
बँक युनियननी आज लाक्षणिक संपाची हाक दिल्याने बँकेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. संपाचे हे आव्हान ऑल इंडिया बँक एप्लॉइज असोसिएशन (AIEBEA) आणि बँक एप्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया (BEFAI) यांनी दिले आहे. याच पार्श्वभुमीवर सिंडिकेट बँकेने असे म्हटले आहे की, संबंधित संपाबाबत बँकांनी त्यांच्या शाखांमधील कामकाज सुरळीत सुरु रहावे यासाठी पावले उचलली आहेत. परंतु संप झाल्यास बँक कामकाजावर परिणाम होऊन ते बंद राहणार आहे.
गेल्या महिन्यात सुद्धा बँक अधिकाऱ्यांच्या युनियनने 26-27 सप्टेंबरला दोन दिवस संपाची हाक दिली होती. मात्र सरकारने हस्तक्षेप केल्यामुळे संप मागे घेण्यात आला होता. याच दरम्यान भारतीय कामगार संघ आणि संबंधित नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्ससह अन्य बँक युनियन यांनी आजच्या संपात आम्ही सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे. एकूण 9 बँक युनियनपैकी 2 युनियनकडून संपाची हाक देण्यात आली आहे.(बँकांचा संप, SBI-BoB यांनी ग्राहकांना दिली 'ही' पूर्वसुचना)
तर संपाची हाक 10 बँकांच्या विलिनिकरणाच्या विरोधात देण्यात येणार आहे. बँकांच्या विलिनिकरणानंतर 4 नव्या बँका अस्तित्वात येणार आहे. तर आंध्रा बँक, इलाहाबाद बँक, सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, युनायडेट बँक ऑफ इंडिया आणि ओरियंएटल बँक ऑफ कॉमर्स यांचे अस्तित्व संपणार आहे.