Ban on Gobi Manchurian: देशभरात बरेच लोक गोबी मंचुरियन (Gobi Manchurian) मोठ्या चवीने खातात. अनेकांचा हा आवडीचा पदार्थ आहे. मात्र सध्या गोव्यात (Goa) या डिशबाबत गदारोळ सुरू आहे. हा गोंधळ इतका वाढला आहे की, आता गोव्यातील म्हापसा या ठिकाणी गोबी मंचुरियनवर चक्क बंदी घालण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, आता तुम्हाला गोबी मंचुरियन गोव्यातील म्हापसा येथे कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये किंवा रस्त्यावरील विक्रेत्याकडे दिसणार नाही. गोव्यातील म्हापसा येथील नगरसेवक तारक आरोलकर यांनी गेल्या महिन्यात बोगेश्वर मंदिराच्या जत्रेदरम्यान गोबी मंचुरियनवर बंदी घालण्याची सूचना केली होती.
उर्वरित कौन्सिलनेही ताबडतोब याला सहमती दर्शविली, त्यानंतर या डिशवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार स्टॉल्सवर आणि उत्सवांमध्ये गोबी मंचुरियन पदार्थ विकला जाणार नाही. मात्र, असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2022 मध्येही गोबी मंचुरियनवर बंदी घालण्यात आली होती.
गोबी मंचुरियनवर बंदी घालण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यात वापरलेला सिंथेटिक रंग. गोबी मंचुरियन बनवण्यासाठी भरपूर सिंथेटिक रंग वापरले जातात. गोबी मंचुरियनला लाल रंग आणण्यासाठी असे रंग वापरले जातात. मात्र, हा कृत्रिम रंग आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. याशिवाय गोबी मंचुरियन बनवताना स्वच्छतेचीही काळजी घेतली गेली नाही. अनेक वेळा रस्त्यावरील विक्रेते मंचुरियन बनवण्यासाठी खराब झालेला कोबी वापरतात. त्याचबरोबर त्यासोबत दिलेली चटणीही दर्जेदार ठरत नव्हती. (हेही वाचा: Hungry Man Eats Raw Cat Meat: केरळमध्ये भुकेलेल्या विद्यार्थ्याने खाल्ले मृत मांजरीचे कच्चे मांस, पोलिसांनी 'अशी' केली मदत; काय आहे नेमक प्रकरण? वाचा)
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अन्न आणि औषध प्रशासनाने काही दिवसांपूर्वी गोबी मंचुरियनच्या काही दुकानांवर छापे टाकले होते. या छाप्यात अस्वच्छ पद्धतीने कोबी मंचुरियन बनवल्याची प्रकरणे उघडकीस आली. याच छाप्यात गोबी मंचुरियन बनवण्यासाठी वापरण्यात येणारा सॉस बनवण्यासाठीही वॉशिंग पावडरचा वापर केल्याचे आढळून आले. या सर्व प्रकारामुळे गोबी मंचुरियनवर बंदी घालण्यात आली आहे.