Ayodhya Ram Mandir Model (Photo Credits: ANI)

अयोध्येत श्री राम मंदिराच्या (Ayodhya Ram Temple) उभारणीचे काम जोरात सुरू आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात भगवान श्रीरामाच्या मूर्तीच्या स्थापनेसोबतच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. मंदिराचा तळमजला तयार आहे. आता पहिल्या मजल्यावर काम सुरू आहे. मंदिराच्या उभारणीपासून ते मूर्तीची स्थापना, दर्शन अशा अनेक बाबतीत विविध अपडेट्स समोर येत आहेत.

आता माहितीनुसार, भाविक फक्त 20 सेकंदच भगवान रामाचे दर्शन घेऊ शकणार आहेत. भाविकांना 25 फूट अंतरावरून रामललाचे दर्शन घेता येणार आहे. यासह भाविकांना राममंदिर संकुलात वेळ व्यतीत करण्यासाठी केवळ एक तासच मिळणार आहे.

श्री राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मीडियाला सांगितले की, डिसेंबर 2023 पर्यंत राम मंदिराचा तळमजला पूर्णपणे तयार होईल. येथेही भिंतींवर कोरीव काम सुरू आहे व ते अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. यासोबतच जानेवारी 2024 मध्ये मंदिरात श्री रामललाच्या बालमूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचा अभिषेक होणार आहे. यासाठी समितीने पंतप्रधानांकडे वेळ मागितला आहे. (हेही वाचा: Jammu kashmir News: 'जय श्री राम' लिहिल्याबद्दल विद्यार्थ्याला शिक्षकाने केली बेदम मारहाण, परिसरात तीव्र आंदोलने)

मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिर परिसरात भाविकांना 1 तासाच्या वर थांबता येणार नाही. मंदिरात प्रवेश करण्यापासून दर्शनापर्यंत फक्त 45 मिनिटे लागतील. 71 एकर परिसरात भाविकांना सहज विहार करता येणार आहे. मंदिराची मुख्य सुरक्षा व्यवस्था राज्य सरकारकडे असेल. जानेवारी 2024 मध्ये मंदिर उघडताच राज्य सरकारसह केंद्राची सुरक्षाही यावर लक्ष ठेवणार आहेत. मंदिरात दररोज 50 हजार ते 10 लाख भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराचे काम 2025 च्या शेवटच्या महिन्यापर्यंत पूर्ण होईल.