मार्च महिन्याची सुरुवात बँकिंग विश्वातील एका मोठ्या बदलाने झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँक (Axis Bank) आणि सिटी बँक (Citibank) यांच्यात रिटेल बिझनेसबाबत अधिग्रहणाची तयारी सुरू होती. आता ते पूर्ण झाले आहे. कोलकातास्थित सिटी बँकेने आपला रिटेल बँकिंग व्यवसाय अॅक्सिस बँकेला विकला आहे. म्हणजेच सिटी बँकेचा रिटेल व्यवसाय आता अॅक्सिस बँकेकडे असेल. हा करार $1.41 अब्ज (11,630 कोटी) मध्ये पूर्ण झाला आहे. या अधिग्रहणानंतर, अॅक्सिस बँक आता आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांसारख्या बड्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करू शकेल.
अॅक्सिस बँकेने बुधवारी जाहीर केले की, त्यांनी सिटीग्रुपचा भारतीय रिटेल बिझनेस 11,603 कोटी रुपयांना पूर्णपणे विकत घेतला आहे. भारतातील सिटी बँक लवकरच सर्व वापरकर्त्यांचा व्यवसाय अॅक्सिस बँकेकडे हस्तांतरित करेल. अशा परिस्थितीत जर तुमचेही सिटी बँके खाते असेल तर आता तुम्हाला काही बदलांना सामोरे जावे लागेल.
होणारे बदल-
- सिटी बँकेत खाते असलेल्या खातेदारांना सर्व व्यवहार अॅक्सिस बँकेतून करावे लागतील. यासोबतच त्यांना अॅक्सिस बँकेच्या सुविधाही घ्याव्या लागतील.
- खातेदारांचा बँक खाते क्रमांक, क्रेडिट आणि डेबिट कार्ड क्रमांक, चेकबुक आणि IFSC आहे तोच राहील.
- सिटी मोबाइल अॅप किंवा सिटी बँक ऑनलाइन सुरू राहील.
- सिटी इंडियाच्या माध्यमातून विमा पॉलिसी घेणार्या लोकांनाही अशाच सुविधा दिल्या जातील, परंतु अॅक्सिस बँक या सुविधा पुरवेल.
- सिटी बँक व्यतिरिक्त, तुम्ही अॅक्सिस बँक किंवा त्यांच्या एटीएममधून पैसे काढू शकाल. एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली जाईल.
- सिटी बँकेत दिला गेलेला व्याजदरच पुढे कायम राहील.
- तुमची म्युच्युअल फंड, PMS किंवा AIF मधील गुंतवणूक अॅक्सिस बँकेकडे हस्तांतरित केली जाईल.
- गृहकर्ज किंवा इतर कर्जामध्ये कोणताही बदल होणार नाही.
ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे दोन्ही बँकांनी सांगितले आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच सिटीग्रुपने भारतातून आपला रिटेल बँकिंग व्यवसाय विकण्याची घोषणा केली होती. या बँकेने अॅक्सिस बँकेकडून कर्ज घेतले होते. अशा परिस्थितीत सिटी बँकेने अॅक्सिस बँकेसोबतचा अधिग्रहणाचा करार पूर्ण केला. या डीलमध्ये अॅक्सिस बँकेला सिटी बँकेचे 30 लाख ग्राहक, सात कार्यालये, 21 शाखा आणि 499 एटीएम मिळणार आहेत. (हेही वाचा: GST collection: जीएसटी संकलनात फेब्रुवारीमध्ये 12 टक्के वाढ; 1.49 लाख कोटी जमा)
सिटी बँकेने 2021 मध्ये भारतासह 13 देशांमधील रिटेल व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. भारतातील सिटी बँक 1985 पासून रिटेल क्षेत्रात व्यवसाय करत आहे. देशभरात त्याच्या 35 शाखा आहेत, ज्यामध्ये सुमारे 4 हजार कर्मचारी काम करतात.