सोशल मिडिया, इंटरनेटच्या या युगात सध्याची तरुण पिढी कोणत्या दिशेला जात आहे हा मोठा प्रश्न आहे. अल्पवयीन मुलांकडून महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता आसामच्या (Assam) नागाव (Nagaon) जिल्ह्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. इथे एका सहा वर्षांच्या मुलीची तीन अल्पवयीन मुलांनी निर्घृण हत्या केली आहे. या मुलीने अश्लील व्हिडिओ पाहण्यास नकार दिल्याने तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. याशिवाय एका आरोपीच्या वडिलांनाही पोलिसांनी पुरावे लपवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
नागावचे पोलीस अधीक्षक आनंद मिश्रा यांनी सांगितले की, सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली आणि मुलीचा मृतदेह कालियाबोर उपविभागाच्या निजोरी येथील तिच्या घराजवळील एका स्टोन क्रशर मिलच्या शौचालयात सापडला. तीन मुलांनी मुलीच्या कुटुंबीयांना ती शौचालयाच्या आत बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती दिली होती. कुटुंबीयांनी तिला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.
मिश्रा म्हणाले की, या मुलीच्या शरीरावर जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी बुधवारी दोन 11 वर्षांच्या मुलांना आणि या प्रकरणातील सहभागासाठी एका आठ वर्षांच्या मुलाला अटक केली. घटनास्थळी भेट दिलेल्या एसपीने सांगितले की, या तीन मुलांनी मुलीला फोनवर अश्लील व्हिडिओ पाहण्यास सांगितले होते. जेव्हा तिने यासाठी नकार दिला, तेव्हा त्यांनी तिला मारहाण केली, ज्यामुळे मुलीचा मृत्यू झाला. (हेही वाचा: हैदराबादमध्ये आईचा लग्नाला होता विरोध, प्रियकराच्या मदतीने मुलीने केला खून)
आरोपींपैकी एकाच्या वडिलांनाही पुरावे लपवण्याचा प्रयत्न आणि पोलिसांना सहकार्य न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मिश्रा म्हणाले की, या गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का हे शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.