रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Asia's Richest Person) ठरले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी शेअर बाजारात अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये झालेली नेत्रदीपक वाढ आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये झालेली घसरण यामुळे गौतम अदानी आशियातील नंबर वन श्रीमंत बनले आहेत. सौदी अरामकोसोबतचा करार तुटल्यानंतर रिलायन्सच्या शेअरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. रिलायन्स इंडस्ट्रीजचा बाजार 1.44 टक्क्यांनी घसरून 2351.40 रुपयांवर बंद झाला.
अदानी समूहाच्या लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी उसळी आली आहे. अदानी पोर्ट्स 4.63 टक्क्यांनी वाढून 763 रुपयांवर, अदानी एंटरप्रायझेस 2.08 टक्क्यांनी वाढून 1742.90 रुपयांवर, तर अदानी ट्रान्समिशन 0.36 टक्क्यांच्या वाढीसह 1948 वर बंद झाले. अदानी समूहाच्या एकूण सहा कंपन्या शेअर बाजारात लिस्ट झाल्या आहेत. ज्यामध्ये या तीन कंपन्यांव्यतिरिक्त अदानी ग्रीन, अडवी पॉवर आणि अदानी टोटल गॅसचा समावेश आहे. गेल्या एका वर्षात गौतम अदानी यांच्या संपत्तीत 55 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे, तर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत केवळ 14.3 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.
बुधवारी अदानी समुहाच्या कंपन्यांच्या एकूण मार्केट कॅपमध्ये 12,000 कोटी रुपयांची आणि निव्वळ मार्केट कॅपमध्ये 4,250 कोटी रुपयांची वाढ झाली. यासह गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. रिलायन्सच्या शेअर्सच्या घसरणीनंतर त्याचे बाजार भांडवल 14.91 लाख कोटी रुपयांवर आले. परंतु, ती अजूनही भारतातील सर्वात मौल्यवान फर्म आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज इन्फ्रास्ट्रक्चरचा हिस्सा 1.57% घसरून 613.85 रुपयांवर आला आहे. या घसरणीनंतर त्याचे मार्केट कॅप 926.91 कोटी रुपये झाले.
ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, अंबानी 96.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत 11 व्या क्रमांकावर होते. अदानी 84.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत 13 व्या क्रमांकावर होते.